कर्जत : तमाशा सारखी पारंपारिक लोककला जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृति
कर्जत : तमाशा सारखी पारंपारिक लोककला जपणं आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तमाशा प्रशिक्षण शिबिर घेणे ही काळाची गरज आहे, कारण अशा प्रशिक्षण शिबिरातूनच नवीन कलावंत घडतील असे प्रतिपादन कर्जतच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कर्जत येथे आयोजित 10 दिवसीय तमाशा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. दिवंगत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नातू डॉ. मोहित सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभास मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, नगरसेवक ऍड. डॉ. अरुण जाधव, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, सचिव गणेश गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संजय नगरकर म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले तमाशा प्रशिक्षण शिबिर ही नवोदित कलावंतासाठी बरेच काही शिकण्याची एक चांगली पर्वणी आहे. या पर्वणीचा नवोदित कलावंतांनी लाभ घेतला पाहिजे. कारण तमाशाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे लोकरंजन व प्रबोधन होते.
अॅॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, तमाशा कला जिवंत ठेवण्यासाठी तमाशा कलावंतांचे संघटन राज्य पातळीवर मजबूत होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तमाशातील वगनाट्यातून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले जाते. यावेळी संभाजी राजे जाधव, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ, योगेश सुपेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दिवंगत शाहीर पठ्ठे बापूराव, दिवंगत तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, नटराज पूजन व दीप प्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभानंतर तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर, रेखा चव्हाण कोरेगावकर, संदीप पंचरास लोणीकर, चंद्रकांत शिंदे, शिवकन्या चव्हाण संगमनेरकर, सागर आव्हाड ठाणगावकर, अश्रुबा वंजारी, शिवाजी वंजारी, शिवकन्या चव्हाण संगमनेरकर, संतोषी वडाळीकर यांच्यासह प्रा. स्वप्निल मस्के व दादा पाटील महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, व शंकरराव पाटील महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. हसन शेख पाटेवाडीकर यांनी प्रास्ताविक केले. भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत शिंदे कापरेवाडीकर यांनी आभार मानले.

COMMENTS