नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रातील जागतिक सहकार्याला नवी दिशा देणार्या ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’चे नेतृत्व भारत करत असल

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रातील जागतिक सहकार्याला नवी दिशा देणार्या ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’चे नेतृत्व भारत करत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी भारताचे विशेष कौतुक केले आहे. 19 व 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत होणार्या या जागतिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आपण स्वतः भारतात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
माध्यमांशी बोलताना गुटेरेस म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता हा आजचा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक विषय आहे. एआयमुळे निर्माण होणार्या संधींबरोबरच आव्हानेही गंभीर स्वरूपाची असून, ही बाब आपल्या काळातील सर्वात मोठ्या जागतिक प्रश्नांपैकी एक आहे. त्यामुळे सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि नागरी समाज यांनी एकत्र येऊन सर्व स्तरांवर सखोल चर्चा करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या महत्त्वाच्या शिखर परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळत असल्याचा मला आनंद आहे. या उपक्रमाचे नेतृत्व भारताने स्वीकारले, ही बाब कौतुकास्पद आहे, असे गुटेरेस यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले. भारताने एआयविषयक जागतिक चर्चेचे सूत्र हातात घेतल्याने समावेशक आणि संतुलित दृष्टिकोन पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुटेरेस यांनी सांगितले की या परिषदेत दिला जाणारा त्यांचा संदेश हा ‘ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्ट’च्या निष्कर्षांशी थेट जोडलेला असेल. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनलची भूमिका काय असावी, संवाद प्रक्रियेतून काय अपेक्षा आहेत, तसेच विकसनशील देशांमध्ये एआयविषयक क्षमता निर्माण करण्यासाठी जागतिक समुदाय अधिक प्रभावीपणे कसा एकत्र येऊ शकतो, याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. भारतासारख्या विकसनशील देशाकडे आधीच लक्षणीय तांत्रिक क्षमता असून, ती अधिक बळकट करणे हेच या शिखर परिषदेचे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, या परिषदेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील एआय अॅक्शन समिटदरम्यान केली होती. भारतात होणारी ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’ ही ग्लोबल साउथमधील पहिली जागतिक एआय शिखर परिषद ठरणार आहे. ‘पीपल, प्लॅनेट अँड प्रोग्रेस’ या तत्त्वांवर आधारित ही परिषद, एआय मानवजातीच्या प्रगतीस हातभार लावेल, समावेशक विकासाला चालना देईल आणि पृथ्वीच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भविष्यदृष्टी मांडते. यापूर्वी 2024 मध्ये झालेल्या ‘फ्यूचर समिट’मध्ये स्वीकारण्यात आलेल्या ग्लोबल डिजिटल कॉम्पॅक्टद्वारे खुले, सुरक्षित आणि समावेशक डिजिटल भविष्य घडवण्याची सामायिक दृष्टी निश्चित करण्यात आली होती. याच अंतर्गत एआयविषयक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनल स्थापन करण्याची बांधिलकी जाहीर करण्यात आली आहे. हे पॅनल वैज्ञानिक समज वाढवून, आंतरराष्ट्रीय चर्चांना उपलब्ध सर्वोत्तम पुराव्यांच्या आधारे दिशा देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS