Homeताज्या बातम्यादेश

लोकसभेत गदारोळात धन्यवाद प्रस्ताव मंजूर

2004 नंतर प्रथमच पंतप्रधानांच्या भाषणाविना प्रक्रिया पूर्णनवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेतील वातावरण अभूतपूर्व गोंधळाने ढवळ

लोकसभेत विरोधकांचा गदारोळ
संसदेत असंसदीय शब्दांना निर्बंध
अविश्‍वास प्रस्ताव आणि विरोधकांची कसोटी !

2004 नंतर प्रथमच पंतप्रधानांच्या भाषणाविना प्रक्रिया पूर्ण
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी संसदेतील वातावरण अभूतपूर्व गोंधळाने ढवळून निघाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव लोकसभेत अखेर मंजूर झाला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर देण्याची संधी न मिळताच प्रस्ताव पारित होणे, ही 2004 नंतरची पहिलीच घटना ठरली. राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे संसद दोन्ही सभागृहांत ठप्प झाली.
गुरुवारी सकाळी लोकसभा सुरू होताच विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी, फलक व बॅनरच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलन सुरू केले. सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र परिस्थिती नियंत्रणात न आल्याने कामकाज काही मिनिटांतच तीन वेळा तहकूब करावे लागले. अखेर गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. या प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात उत्तर देणे अपेक्षित होते; मात्र विरोधी सदस्य थेट सत्ताधारी बाकांपर्यंत पोहोचल्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकारास गंभीर ठरवत, पंतप्रधानांनी सभागृहात येऊ नये, अशी सूचना केल्याचे स्पष्ट केले. सभागृहाच्या शिष्टाचाराचा भंग झाला असून, अशा वातावरणात कामकाज चालू ठेवणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेसचे निलंबित खासदार माणिकम टागोर यांनी, जोपर्यंत राहुल गांधी यांना बोलण्याची संधी दिली जात नाही, तोपर्यंत पंतप्रधानांना बोलू देणार नाही, अशी भूमिका जाहीर केल्याने संघर्ष आणखी तीव्र झाला.

व्यापार करारांमुळे तरुणांसाठी नव्या संधी ः पंतप्रधान मोदी
भारताने अलीकडे केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार करारांमुळे देशातील तरुणांना मोठा लाभ होणार असून, त्यांच्यासाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले झाले आहेत, असा ठाम विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. राज्यसभेत बोलताना त्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक विश्‍वासार्हतेकडे लक्ष वेधले. पंतप्रधानांनी सांगितले की, विविध पक्षांच्या शिष्टमंडळांनी अलीकडे केलेल्या आंतरराष्ट्रीय दौर्‍यांतून एक महत्त्वाची बाब प्रकर्षाने जाणवली आहे-जग आज भारताकडे समकक्ष भागीदार म्हणून पाहत आहे. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर सरकारने दिलेल्या भरामुळे जागतिक स्तरावर भारतावरील विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. देशांतर्गत राबविण्यात येत असलेल्या धोरणात्मक प्रयत्नांचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांचा सभात्याग
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत आहेत. भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. विरोधी नेत्यांनी राहुल गांधींना बोलू द्यावे, हुकूमशाही चालणार नाही, असे म्हटले. यावर पंतप्रधानांनी म्हटले की, खरगेजींचे वय लक्षात घेता त्यांना बसून घोषणा देण्याची परवानगी द्यावी, अखेर विरोधकांनी राज्यसभेचा पंतप्रधानांच्या भाषणावेळी त्याग केला.

खा. राहुल गांधींना बोलू न दिल्याने विरोधक आक्रमक
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनीही संसदेत बोलण्याचा हक्क अधोरेखित करत, प्रत्येक खासदाराला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांना तो नाकारणे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात आहे, असे सांगितले. त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावर सरकारकडून स्पष्ट भूमिका न मांडल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. सततच्या गोंधळामुळे लोकसभा अखेर शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. सभापती ओम बिर्ला यांनी सर्व सदस्यांना संसदीय परंपरा जपण्याचे आणि अर्थसंकल्पीय चर्चेला मार्ग मोकळा करून देण्याचे आवाहन केले.

COMMENTS