मुंबई : राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प

मुंबई : राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते. राज्यात औद्योगिक विकासासाठी विविध विभागांमध्ये एकूण 8,969 एकर क्षेत्र उपलब्ध असून नव्याने 20,431 एकर जमीन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठी मागणी येत असून उद्योजकांना लागणार्या जागेचा विचार करुन एमआयडीसीने एक लाख एकर जागा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. मुंबई-पुणे-नागपूर बरोबरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी भागांमध्ये गुंतवणूकदारांकडून जमिनीची मागणी वाढत आहे. यादृष्टीने संबंधित जिल्हाधिकार्यांनी भूसंपादनाच्या कामांना गती द्यावी. यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते साहाय्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती
वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

COMMENTS