बीड । प्रतिनिधीमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दु:खद निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्

बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दु:खद निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्याशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते. बीडच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात विकासाची नवी आशा निर्माण झाली होती.
पालकमंत्री म्हणून कार्यकाळात त्यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. रेल्वे सुविधा, विमानतळ, ट्रिपल आयटी (खखख-ढ), सहकार भवन, जिल्हा क्रीडा संकुल, सिल्क पार्क, रुग्णालयांसाठी नवीन इमारती व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती व बांधकाम, अंगणवाड्यांसाठी निधी, स्मशानभूमी विकास, ग्रामीण रस्त्यांचे मजबुतीकरण, नर्सिंग कॉलेज, वसतिगृहे, फसवणूक झालेल्या ठेवीदारांसाठी मदत, कंकालेश्वर मंदिर, नाट्यगृह आदींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या विकासकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज शुक्रवार, दि. 30 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आंदोलनकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि अजितदादांवर प्रेम करणार्या बीडकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर), माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रदेशाध्यक्ष – शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष – आम आदमी पार्टी), रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष – इंटक), सय्यद सादेक (शहराध्यक्ष – आम आदमी पार्टी), प्राचार्य डी. जी. तांदळे (जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड), राजकुमार कदम (सरचिटणीस – मराठवाडा शिक्षक संघ), धनंजय सानप (जिल्हाध्यक्ष – महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना), संजय भालशंकर, भाई गौतम आगळे (नेते – रोजंदारी मजूर सेना), शेतकरी हक्क मोर्चाचे सुहास जायभाये, माईकल अशोक वाघमारे, संभाजी कदम लोणीकर आदी उपस्थित होते. अजितदादांनी केलेली विकासकामे बीडकरांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

COMMENTS