मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवे उच्चांक गाठणार्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज त

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवे उच्चांक गाठणार्या सोने आणि चांदीच्या दरांना अखेर ब्रेक लागला आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज तसेच सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली. चांदीचे दर तब्बल 20 हजार रुपयांनी कोसळले, तर सोन्याच्या दरात सुमारे 4 हजार रुपयांची घट झाली आहे.
अलीकडे जागतिक पातळीवर अस्थिरता, भूराजकीय तणाव आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला ओढा यामुळे सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत होती. मात्र, गुरुवारी ही तेजी थांबली असून बाजारात मोठी घसरण दिसून आली. चांदीच्या 5 मार्च एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी 3 लाख 25 हजार 602 रुपयांवर पोहोचले होते. मात्र गुरुवारी त्यात सुमारे 19 हजार 849 रुपयांची घट होऊन दर 3 लाख 5 हजार 753 रुपयांवर आले. ही घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक मानली जात आहे. सोन्याच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचे दर 4 हजार 85 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 48 हजार 777 रुपयांवर आले आहेत. बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड व युरोप संदर्भातील धोरणांमधील बदल तसेच जागतिक आर्थिक संकेतांमुळे या घसरणीला चालना मिळाली आहे. सराफा बाजारातही याचे पडसाद उमटले आहेत. चांदीचा दर सुमारे 15 हजार 513 रुपयांनी घसरला असून जीएसटीसह चांदीचा दर 3 लाख 12 हजार 691 रुपये इतका आहे. दरम्यान, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 2 हजार 728 रुपयांची घट झाली असून जीएसटीसह एक तोळा सोन्याचा दर 1 लाख 56 हजार 43 रुपये झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 2 हजार 499 रुपयांनी कमी होऊन 1 लाख 38 हजार 773 रुपयांवर आला असून जीएसटीसह हा दर 1 लाख 42 हजार 936 रुपये इतका आहे. सोने-चांदीच्या दरातील ही घसरण गुंतवणूकदारांसाठी दिलासा ठरणार की पुन्हा तेजी येणार, याकडे आता बाजाराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS