अमरावती : भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ

अमरावती : भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यासारखीच हत्या करू असा धमकीचा फोन थेट पोलिसांच्या 112 क्रमांकावर आल्याची माहिती आहे.
या प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नवनीत राणा यांना यापूर्वीही अशा स्वरूपाच्या धमक्यांचा सामना करावा लागलेला आहे. काही महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे, नोव्हेंबर महिन्यात एका पत्राद्वारे अश्लील व धाकदायक भाषेत धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या वेळीही पोलिसांत तक्रार दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, अमरावती महापालिका निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वाखालील गटाला महापालिकेत मोठे यश मिळाल्यानंतर विजयाचा जल्लोष करण्यात आला होता. मात्र, या निकालानंतर राजकीय टीका-टिप्पणींना वेग आला. विशेषतः, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवनीत राणा यांच्याबाबत वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवरच धमकीचा हा प्रकार घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नवनीत राणा यांची सुरक्षा वाढवली असून, धमकी देणार्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक व मानवी स्रोतांच्या मदतीने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

COMMENTS