सँटियागो : चिलीच्या दक्षिण भागातील जंगलांमध्ये भीषण वणवा पेटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. रविवारी उसळलेल्या या आगीत आतापर्यंत किमान 18 ज

सँटियागो : चिलीच्या दक्षिण भागातील जंगलांमध्ये भीषण वणवा पेटल्याने मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. रविवारी उसळलेल्या या आगीत आतापर्यंत किमान 18 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. प्रचंड उष्णता, कोरडे हवामान आणि जोरदार वार्यांमुळे आग झपाट्याने पसरत असून ती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.
आगीच्या तीव्रतेमुळे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमुळे हजारो नागरिकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चिलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक यांनी नुबल आणि बायोबायो या प्रांतांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. ‘स्थिती गंभीर असून सर्व आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जात आहेत,’ असे त्यांनी सामाजिक माध्यमांवरून स्पष्ट केले. चिलीच्या राष्ट्रीय वनविभाग (सीओएनएएफ) च्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत देशभरात 24 सक्रिय आगी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यापैकी सर्वाधिक धोकादायक आगी नुबल आणि बायोबायो या भागांत पसरल्या असून हे प्रांत राजधानी सँटियागोपासून सुमारे 500 किलोमीटर दक्षिणेला आहेत. या दोन भागांमध्ये आतापर्यंत सुमारे 8,500 हेक्टर क्षेत्र आगीत भस्मसात झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन संस्था सेनाप्रेडच्या माहितीनुसार, या आगीमुळे किमान 20 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही अंदाजानुसार स्थलांतरितांची संख्या 50 हजारांपर्यंत जाऊ शकते. तसेच किमान 250 घरे पूर्णपणे जळून खाक झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीवर सरकारकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

COMMENTS