Homeताज्या बातम्यादेश

भाजप आज देशात जनतेची पहिली पसंती ठरतोय : पंतप्रधान मोदी

दिसपूर : भाजप आज संपूर्ण देशात जनतेची पहिली पसंती बनली आहे. चांगले शासन आणि विकासावर विश्‍वास ठेवणारी जनता सातत्याने भाजपच्या पाठीशी उभी राहत आहे,

भाजपच्या विकास मॉडेलवर झेन-जी पिढीचा विश्‍वास ः पंतप्रधान मोदी
९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…
मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्याची भाजपला सोडचिठ्ठी… ‘या’ पक्षात केला प्रवेश

दिसपूर : भाजप आज संपूर्ण देशात जनतेची पहिली पसंती बनली आहे. चांगले शासन आणि विकासावर विश्‍वास ठेवणारी जनता सातत्याने भाजपच्या पाठीशी उभी राहत आहे, असे ठाम मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममध्ये व्यक्त केले. दोन दिवसांच्या आसाम दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधानांनी काझीरंगा परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
या दौर्‍यात पंतप्रधान मोदी यांनी काझीरंगा नॅशनल पार्क परिसरात सुमारे 6,957 कोटी खर्चाच्या 35 किमी लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे भूमिपूजन केले. याशिवाय दिब्रूगढ-गोमती नगर (लखनऊ) आणि कामाख्या-रोहतक या दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, काझीरंगाला पुन्हा येण्याचे भाग्य मला लाभले आहे. दोन वर्षांपूर्वी येथे घालवलेले क्षण आजही स्मरणात आहेत. काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये रात्री मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी केलेली हत्ती सफारी हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. आसाममध्ये आलो की नेहमीच वेगळा आनंद मिळतो. राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या दीड-दोन वर्षांत भाजपवरील जनतेचा विश्‍वास अधिक दृढ झाला आहे. बिहारमध्ये अनेक वर्षांनंतर भाजपला विक्रमी मताधिक्य आणि जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांतही पहिल्यांदाच भाजपला मोठा जनादेश मिळाला. केरळसारख्या राज्यातसुद्धा भाजपला वाढता पाठिंबा मिळत असून, तिरुवनंतपुरममध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडून आला आहे. हे सर्व निकाल स्पष्टपणे दाखवतात की देशाला सुशासन आणि विकास हाच मार्ग हवा आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला, मात्र आज त्याच मुंबईत ती चौथ्या-पाचव्या क्रमांकावर आहे. विकासाचा ठोस दृष्टिकोन नसल्यामुळे देशाचा विश्‍वास काँग्रेसवरून उडाला आहे. काझीरंगाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, काझीरंगा हे केवळ राष्ट्रीय उद्यान नसून आसामची ओळख आहे. भारताच्या जैवविविधतेचा हा अमूल्य ठेवा असून, युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. येथे दरवर्षी ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर वन्यजीवांचे सुरक्षित स्थलांतर हे मोठे आव्हान असते. गेंडे, हत्ती अनेकदा रस्त्यांजवळ अडकतात. त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हा एलिव्हेटेड कॉरिडॉर अत्यंत आवश्यक आहे. ईशान्य भारताच्या विकासाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, दशकानुदशके येथील जनतेला विकासापासून वंचित असल्याची भावना होती. ही भावना बदलण्याचे काम आम्ही केले आहे. ईशान्य भारताच्या रेल्वे व दळणवळण सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले.



काझीरंगा कॉरिडॉरमुळे वन्यजीव, रस्ते आणि कनेक्टिव्हिटीला फायदा ः बिस्वा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या प्रकल्पाचे स्वागत करताना सांगितले की, काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे वन्यजीव संरक्षण, रस्ते सुरक्षितता आणि कनेक्टिव्हिटी या तिन्ही बाबींना मोठा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगाराच्या संधीही वाढतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग-715 वरील दोन लेनचा रस्ता चार लेनमध्ये रूपांतरित करण्यात येणार असून, 34.5 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे. पावसाळ्यात हा कॉरिडॉरखालचा भाग वन्यजीवांसाठी सुरक्षित मार्ग म्हणून उपयोगात येणार आहे.

COMMENTS