Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडकरांनी ‘बिलोली पॅटर्न’ला नकार दिला , विकास आघाड्यांचा प्रयोग फसला, भाजपची बी-प्लॅन रणनीती उघडी पडली

नांदेड । प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली असली, तरी निवडणुकीदरम्यान राबविण्यात आ

शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीत ’तू-तू मैं-मैं’
महाविकास आघाडी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू !

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली असली, तरी निवडणुकीदरम्यान राबविण्यात आलेल्या ‘बिलोली पॅटर्न’वर आधारित विकास आघाड्यांचा प्रयोग मात्र मतदारांनी साफ नाकारला आहे. जिल्ह्यातील काही नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर भाजपने नांदेड शहरातही दोन प्रभागांमध्ये स्वतंत्र आघाड्या उभ्या करून एक प्रकारचा ‘बी-प्लॅन’ राबविला होता. मात्र शहरी मतदारांनी या राजकीय गणिताला छेद दिला.
नांदेड महानगरपालिकेत भाजपला थेट दलित व मुस्लिम मतदारांमध्ये अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही, असा अंदाज बांधून काही प्रभागांत छुप्या पाठिंब्याने आघाड्यांच्या बॅनरखाली उमेदवार उभे करण्यात आले. प्रभाग क्रमांक 18 खडकपुरा-देगाव चाळ येथे मराठवाडा जनहित पार्टीच्या वतीने मयुरी धबाले, नाझिया बेगम, कमलबाई लांडगे आणि गफार खान यांना मैदानात उतरविण्यात आले होते. मात्र हे चारही उमेदवार पराभूत झाले. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7 जयभीमनगर-मगदूमनगर येथे शहर विकास आघाडीच्या बॅनरखाली सुभाष रायबोळे, मेहरूनिस्सा बेगम, प्रियांका कांबळे आणि अभिजीत कदम यांना संधी देण्यात आली होती. येथेही मतदारांनी स्पष्ट नकार देत या चौघांनाही घरी बसवले. या पार्श्वभूमीवर ‘बिलोली पॅटर्न’ नेमका काय होता, याचे राजकीय विश्लेषण महत्त्वाचे ठरते. बिलोली नगरपरिषद निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीने नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले होते. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या प्रयोगाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. धर्माबाद नगरपरिषद व भोकर नगरपरिषदेतही या आघाडीला काही प्रमाणात यश मिळाल्याने भाजपच्या रणनीतीकारांना हा फॉर्म्युला नांदेड शहरातही चालेल, असा विश्वास वाटला. भाजपची ही रणनीती दोन पातळ्यांवर आधारित होती. एक म्हणजे, जर भाजप बहुमतापासून काही जागा कमी पडला, तर या आघाड्यांच्या मदतीने सत्ता स्थापन करता येईल. दुसरे म्हणजे, पारंपरिक विरोधी मतदारांचे विभाजन करून भाजपचा अप्रत्यक्ष फायदा करून घेणे. मात्र नांदेडच्या शहरी मतदारांनी हा प्रयोग ओळखत ‘छुप्या राजकारणाला’ स्पष्ट नकार दिला. तथापि, या पराभवाकडे एकांगी दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. पराभूत उमेदवारांनी अनेक ठिकाणी सत्ताधारी व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना जबरदस्त लढत दिली, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की, आघाडीचा पॅटर्न पूर्णतः अपयशी ठरला नसून, योग्य परिस्थितीत व स्पष्ट राजकीय भूमिकेसह तो यशस्वी ठरू शकतो. एकूणच, नांदेड महानगरपालिकेच्या निकालातून भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले, तरी विकास आघाड्यांच्या प्रयोगातून मतदारांची मानसिकता, शहरी राजकारणातील पारदर्शकतेची अपेक्षा आणि ‘बी-प्लॅन’च्या मर्यादा उघड झाल्या आहेत. भविष्यात अशा प्रयोगांना मतदार कितपत स्वीकारतात, हे स्थानिक राजकारणातील स्पष्टता आणि विश्वासार्हतेवर अवलंबून राहील.

COMMENTS