नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत स्वामी आणि गाडीवाले या दोन राजकीय कुटुंबांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचे

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत स्वामी आणि गाडीवाले या दोन राजकीय कुटुंबांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचे घराणेशाहीचे आरोप फोल ठरवले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांना संधी देण्यात आल्याने या दोन्ही घराण्यांवर जोरदार टीका करण्यात येत होती. मात्र मतदारांनी या आरोपांकडे दुर्लक्ष करत चारही उमेदवारांना दणदणीत विजय देत स्पष्ट संदेश दिला आहे.
या निवडणुकीत किशोर स्वामी आणि वीरेंद्रसिंग गाडीवाले यांच्यावर ‘घराणेशाही’चा ठपका ठेवत विरोधकांनी प्रचाराचा रोख अधिक तीव्र केला होता. मात्र निकालानेच या टीकेची हवा काढून टाकली. स्वामी व गाडीवाले कुटुंबातील चारही सदस्यांनी विजयाचा चौकार ठोकत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले असून, भाजपच्या एकूण विजयात त्यांचा वाटा निर्णायक ठरला आहे. नांदेडच्या राजकारणात स्वामी व गाडीवाले कुटुंबांचे वर्चस्व आजचे नाही. गेल्या तीन महापालिका निवडणुकांपासून या दोन्ही घराण्यांतील प्रत्येकी दोन सदस्य सातत्याने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहेत. किशोर स्वामी यांच्या पत्नी शैलजा स्वामी यांनी यापूर्वी महापौर पद भूषविले असून, त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा फायदा या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसून आला. किशोर स्वामी यांनी स्थायी समितीचे सभापतीपद भूषविले असल्याने त्यांचा प्रशासनातील दांडगा अनुभव मतदारांच्या विश्वासास पात्र ठरला. दुसरीकडे वीरेंद्रसिंग गाडीवाले आणि त्यांचे वडील बलवंतसिंग गाडीवाले यांनीही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका सभागृहात आपले स्थान भक्कम ठेवले आहे. गाडीवाले कुटुंबातील सदस्यांनीही सभापतीपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून, त्याचा थेट लाभ त्यांच्या जनाधारात वाढ होण्यास झाला. राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने पाहता, मतदारांनी केवळ कौटुंबिक वारशाला नव्हे, तर जनसंपर्क, उपलब्धता आणि स्थानिक प्रश्नांवरील कामगिरीला कौल दिला आहे. एकाच घरातील दोन उमेदवारांना संधी देणे हा निर्णय भाजपसाठी धोकादायक ठरेल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र स्वामी आणि गाडीवाले कुटुंबांनी आपल्या प्रभागातील चारही जागा जिंकून हा निर्णय योग्य ठरवला आहे. या विजयामुळे एकीकडे भाजपच्या यशाचा जल्लोष वाढला असतानाच, दुसरीकडे घराणेशाहीच्या टीकेला मतदारांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. परिणामी, स्वामी आणि गाडीवाले कुटुंबांचा राजकीय प्रभाव अधिक मजबूत झाला असून, त्यांच्या विजयाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगू लागली आहे.या निकालातून एक महत्त्वाचा राजकीय संकेत स्पष्टपणे पुढे येतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार आता ‘घराणेशाही’ या संकल्पनेकडे सरसकट नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नाहीत, तर कामगिरी, उपलब्धता आणि सातत्य या निकषांवर उमेदवारांचे मूल्यमापन करत आहेत. स्वामी व गाडीवाले कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षांत प्रभाग पातळीवर निर्माण केलेला जनसंपर्क, नागरिकांच्या प्रश्नांमध्ये घेतलेली पुढाकाराची भूमिका आणि महापालिकेतील प्रभावी उपस्थिती यामुळे मतदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप केवळ प्रचारापुरते मर्यादित ठरले. राजकीयदृष्ट्या पाहता, भारतीय जनता पक्षसाठी हा निकाल दुहेरी अर्थाने महत्त्वाचा आहे. एकीकडे पक्षाने एकाच कुटुंबातील दोन उमेदवारांना संधी देण्याचा जो धाडसी निर्णय घेतला होता, तो यशस्वी ठरला; तर दुसरीकडे स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवण्याची रणनीती योग्य असल्याचेही अधोरेखित झाले. भविष्यातील निवडणुकांसाठी भाजप ‘घराणेशाही’ विरुद्ध ‘कार्यक्षम घराणी’ असा नवा राजकीय संवाद उभा करू शकतो, अशी शक्यता या निकालातून निर्माण झाली आहे.

COMMENTS