जानेवारीअखेर निर्णयाची शक्यतामुंबई ः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 25 वर्षां

जानेवारीअखेर निर्णयाची शक्यता
मुंबई ः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तब्बल 25 वर्षांपासून ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका अखेर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना युतीकडे गेली आहे. या निकालामुळे मुंबईच्या सत्ताकेंद्रात ऐतिहासिक बदल घडला असून, भाजप पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत प्रमुख सत्ताधारी ठरला आहे. मात्र सत्ता आली असली, तरी मुंबईचा महापौर नेमका कोण? असा सवाल केला जात आहे.
या निवडणुकीत भाजपने 88 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला, तर शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांची युती अपरिहार्य ठरते. त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर भाजपचा महापौरपदावर नैसर्गिक दावा असला, तरी शिंदे गटही या पदासाठी आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. महापौरपदावरून निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले होते. ठाकरे बंधूंनी ‘मुंबईचा महापौर मराठीच हवा’ अशी ठाम भूमिका घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून सुरुवातीला ‘महापौर हिंदू असेल’ अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र प्रचाराच्या अखेरीस वाढता वाद लक्षात घेता भाजपलाही ‘महापौर मराठीच असेल’ असे स्पष्ट करावे लागले. आता निकालानंतर या भूमिकेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महापौरपदाचा निर्णय तात्काळ होण्याची शक्यता कमी आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. येत्या आठवड्यात नगरविकास विभागाकडून महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढली जाणार असून, त्यानंतर साधारण दहा दिवसांत अधिकृत निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत मुंबईच्या महापौरपदावर सस्पेन्स कायम राहणार आहे.
भाजप कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब
भाजपमध्येच महापौरपदासाठी अनेक इच्छुक नगरसेवक रांगेत असल्याचे सांगितले जाते. अखेर वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, यावर सर्वांचे लक्ष असेल. 25 वर्षांनंतर मुंबईच्या सत्तेत घडलेल्या या मोठ्या बदलानंतर आता ‘महापौर कोण?’ हा प्रश्न केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

COMMENTS