Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपाचा प्रचार यंत्रणेवर भर, काँग्रेसची रणनीती मात्र संभ्रमात

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्या

नांदेड भाजपला धक्का : तरोडा-सांगवी मंडळ अध्यक्ष सुनील राणे यांचा राजीनामा, अंतर्गत अस्वस्थतेचा स्फोट
भाजपचे राज्यसभेचे राजकीय समीकरण !
भाजपच्या विकास मॉडेलवर झेन-जी पिढीचा विश्‍वास ः पंतप्रधान मोदी

नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असून, भारतीय जनता पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपाकडून शहरभर आक्रमक प्रचार, संघटनात्मक ताकद आणि नियोजनबद्ध पद्धतीने वातावरणनिर्मिती केली जात असताना काँग्रेस मात्र अद्याप ठोस रणनीती आखण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
भाजपाने निवडणुकीच्या तयारीसाठी बूथनिहाय नियोजन करत प्रचार समित्या सक्रिय केल्या आहेत. शहरातील विविध भागांमध्ये झेंडे, बॅनर, होर्डिंग्ज, पत्रके व डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने भाजपाचा प्रचार वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत समन्वय साधून प्रचार यंत्रणा काम करत असल्याने भाजपाची उपस्थिती सर्वत्र जाणवत आहे. याउलट काँग्रेस पक्षामध्ये अद्याप प्रचाराची ठोस दिशा स्पष्ट झालेली नाही. पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी आणि नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसची भूमिका संभ्रमावस्थेत अडकली असल्याची चर्चा आहे. निवडणूक जाहीर होऊनही प्रचाराची गती कमी असून, अनेक प्रभागांमध्ये काँग्रेसचे उमेदवार मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकले नसल्याची नाराजी कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. राजकीय विश्‍लेषकांच्या मते, भाजपाने केवळ सत्तेचा मुद्दा न मांडता ‘विकास’, ‘स्थिरता’ आणि ‘डबल इंजिन सरकार’ या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला आहे. त्याचबरोबर मागील काळातील विकासकामांचा दाखला देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ताधार्‍यांवर टीका केली जात असली तरी त्या टीकेला पर्यायी विकासदृष्टी किंवा विश्‍वासार्ह आराखडा जोडलेला दिसून येत नाही. शहरातील राजकीय चर्चांमध्ये काँग्रेस ‘कानावर हात ठेवून बसल्याची’ भावना निर्माण झाली असून, केवळ विरोधाच्या भूमिकेवर निवडणूक जिंकणे कठीण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. निवडणुकीसाठी उरलेला कालावधी कमी होत चालल्याने काँग्रेसने तातडीने संघटनात्मक हालचाली वाढवणे आणि प्रचाराला गती देणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान, मतदारांमध्ये भाजपाची सक्रियता ठळकपणे जाणवत असून, येत्या काही दिवसांत प्रचाराचा आणखी जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत होणार की इतर पक्ष समीकरणे बदलणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

COMMENTS