झेंडे बदलणार्या नगरसेवकांना नागरिकांकडून प्रश्नांची लाखोली.. नांदेड । प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विव
झेंडे बदलणार्या नगरसेवकांना नागरिकांकडून प्रश्नांची लाखोली..
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्ये पाहणी केली असता एकच वास्तव प्रकर्षाने समोर येत आहे-नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्या अजूनही जैसे थेच आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण आणि सुरक्षितता या अत्यावश्यक बाबींमध्ये गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित सुधारणा झालेल्या दिसत नाहीत. विशेष म्हणजे या प्रश्नांकडे सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचा तीव्र आरोप नागरिकांकडून होत आहे.
महानगरपालिकेकडे नियमितपणे घरपट्टी, नळपट्टी आणि विविध कर भरले जात असतानाही त्याच्या बदल्यात मिळणार्या सुविधा अत्यंत अपुर्या असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये आठवड्यातून दोन-तीन वेळाच पाणीपुरवठा होतो. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येते, तर अनेक वसाहतींमध्ये आजही टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपट्टी मात्र वेळेवर वसूल केली जाते, पण पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, नियमितता आणि पुरवठा याबाबत मनपाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिक सांगतात. दूषित पाण्यामुळे आजार वाढत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळत आहेत. ड्रेनेज व्यवस्थेची अवस्था तर अधिकच गंभीर आहे. जुने, मोडकळीस आलेले नाले, वारंवार तुंबणार्या ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावर वाहणारे सांडपाणी हे शहराचे नित्याचे दृश्य झाले आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनच नसल्याने घरगुती सांडपाणी थेट रस्त्यावर सोडले जाते. पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिघडते-दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांची रेलचेल सुरू होते, मात्र प्रत्यक्ष कामे न झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था ही प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरत आहे. खड्ड्यांनी भरलेले रस्ते, उखडलेले सिमेंट काँक्रिट, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी, वृद्ध आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्ते वारंवार खोदले जातात, मात्र त्यांची नीट डागडुजी केली जात नाही. रात्री अपुर्या स्ट्रीट लाईटमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, पावसाळ्यात खड्डे आणि नाले यात फरक करणेही कठीण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. घनकचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडालेला आहे. अनेक वसाहतींमध्ये कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. मोकळ्या जागा, रस्त्यांच्या कडेला किंवा प्लॉटमध्ये कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो. काही ठिकाणी बाजार भरतो त्या परिसरातच कचर्याचे ढीग असल्याने व्यापारी आणि नागरिक दोघेही त्रस्त आहेत. मनपाची स्वच्छता यंत्रणा केवळ कागदावरच कार्यरत असल्याची टीका होत आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीतही शहराची स्थिती समाधानकारक नाही. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे अपुरी असून, साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा अभाव जाणवतो. साध्या आजारांसाठीही नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे आर्थिक बोजा वाढतो. साथीच्या आजारांच्या काळात मनपाची आरोग्ययंत्रणा अपुरी पडते, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. स्वच्छता आणि आरोग्य यांचा थेट संबंध असतानाही दोन्ही आघाड्यांवर अपयश दिसून येत असल्याने आरोग्य हा निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरत आहे. शिक्षण, खेळ आणि सामाजिक सुविधांच्या बाबतीतही शहर मागे पडलेले दिसते. अनेक भागांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांचा अभाव आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना खाजगी शाळांकडे वळावे लागते. मुलांसाठी खेळाची मैदाने नाहीत, हरितपट्टे, वाचन कट्टे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याच्या सुविधा अपुर्या आहेत. महिलांसाठी सुलभ शौचालयांचा अभाव असल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांत निवडून आलेले नगरसेवक नागरिकांच्या संपर्कात नव्हते, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. काही अपवाद वगळता अनेक लोकप्रतिनिधी निवडणुकीनंतर अदृश्य झाले, समस्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही आणि केवळ निवडणुकीच्या वेळीच पुन्हा समोर येत असल्याची भावना आहे. आता हीच मंडळी पक्ष बदलून किंवा नव्या घोषणांसह पुन्हा मैदानात उतरली आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यावेळी केवळ घोषणा आणि पक्षनिष्ठा न पाहता कामाचा हिशेब मागू, असा सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे बेफिकिरीने पाहणार्या सर्वच पक्षांच्या नगरसेवकांना यावेळी मतपेटीतून धडा शिकवण्याच्या तयारीत मतदार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

COMMENTS