नव वर्षाचे स्वागत करतांना स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोटजिनिव्हा ः स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ क्रान्स-मॉन्टाना येथे नवीन वर्षाच्या स्वागता

नव वर्षाचे स्वागत करतांना स्की रिसॉर्टमध्ये भीषण स्फोट
जिनिव्हा ः स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ क्रान्स-मॉन्टाना येथे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या जल्लोषाला गुरुवारी रात्री भीषण दुर्घटनेने गालबोट लागले. येथील एका आलिशान स्की रिसॉर्टमधील नाईट बारमध्ये झालेल्या जोरदार स्फोटात किमान 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
पोलिस सूत्रांनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे साडेएकच्या सुमारास ‘कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर काही क्षणांतच परिसरात आग भडकली, त्यामुळे बारमध्ये उपस्थित असलेले अनेक जण गंभीररीत्या भाजले गेले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य अद्याप सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण क्रान्स-मॉन्टाना शहर ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यात आले आहे. परिसर सील करून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या आतषबाजीमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्विस पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आज दुपारी पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात येणार आहे.

COMMENTS