मुंबईकरांची उडाली तारांबळ; भिजतच केला अनेकांनी प्रवासमुंबई ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना हवामानाने अनपेक्षित धक्का दिला. गुरुवारी पहाटे

मुंबईकरांची उडाली तारांबळ; भिजतच केला अनेकांनी प्रवास
मुंबई ः नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना हवामानाने अनपेक्षित धक्का दिला. गुरुवारी पहाटेपासून शहरातील अनेक भागांत अचानक पावसाने हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या अवकाळी सरींमुळे नववर्षाची सुरुवातच ओलसर वातावरणात झाली. कामावर जाण्यासाठी लवकर घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. अनेकांकडे छत्री किंवा रेनकोट नसल्याने भिजतच प्रवास करण्याची वेळ आली.
या अनपेक्षित पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांबरोबरच हवामान खात्यालाही आश्चर्य वाटले आहे. कारण मुंबईसाठी पावसाचा कोणताही पूर्वानुमान जाहीर करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे पहाटे अचानक सुरू झालेल्या सरींमागील कारणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. हवामानाच्या अंदाजाला छेद देत झालेल्या या पावसामुळे नवीन वर्षाची पहिली सकाळच वेगळ्या अनुभवाची ठरली. दक्षिण मुंबईसह मध्य आणि पूर्व उपनगरांमध्ये पहाटेपासून पावसाचा जोर जाणवला. वरळी, दादर, सायन, चेंबूरपासून नवी मुंबईतील वाशीपर्यंत अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. याचा परिणाम सकाळच्या वाहतुकीवर झाला असून काही मार्गांवर संथ गतीने वाहतूक सुरू होती. हिवाळ्यात असा पाऊस सहसा न पडल्याने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राज्याच्या बहुतांश भागांत सध्या थंडीचा प्रभाव वाढलेला असताना मुंबईत मात्र पावसामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. थंडी आणि दमटपणा यांचा एकत्रित अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत किमान तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली असून काही ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. अधिकृत थंडीची लाट जाहीर झाली नसली तरी सकाळ-संध्याकाळचा गारठा अधिक जाणवत आहे. मुंबई, कोकण आणि इतर किनारी भागांत रात्री व पहाटे थंड वारे वाहत असतानाच दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका जाणवत आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील ही तफावत नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

COMMENTS