तापलेली गाझापट्टी

Homeसंपादकीय

तापलेली गाझापट्टी

गेल्या सात दिवसांपासून सुरू झालेला इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. हा वाद आता स्थानिक राहिलेला नाही.

काँगे्रस गळती रोखणार कशी ?
संशयाचे राजकीय धुके
आजची महिला आणि सक्षमीकरण

 गेल्या सात दिवसांपासून सुरू झालेला इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अजूनही सुरूच आहे. हा वाद आता स्थानिक राहिलेला नाही. त्याला जागतिक स्वरुप येत आहे. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद अलीकडचा नाही, तर त्याला शंभर वर्षांचा इतिहास आहे. आता सुरू झालेला वाद हा नेहमीच्या संघर्षासारखा दिसत असला,तरी त्याची पाळेमुळे वेगळीच असल्याची शंका तज्ज्ञांना आहे. त्याचे कारण गेल्या दोन वर्षांत चारवेळा निवडणूक होऊनही इस्त्राईलमध्ये  राजकीय स्थैर्य आलेले नाही. 

    बेंजामिन नेत्यानाहू सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले असले, तरी गेल्या दोन वर्षांत त्यांना आपले बूड स्थिर करता आलेले नाही. जेव्हा एखाद्या देशाच्या राजकीय नेत्याला स्थिरता येत नाही, तेव्हा ते राष्ट्रवादाचा आधार घेतात. विरोधकांना आणि जनतेला शांत करण्याचा प्रयत्न करतात. नेत्यानाहू यांना संसदीय परंपरेतून सत्ताधीश होता येत नाही. त्यामुळे त्यांना आता जनतेतून पंतप्रधान होण्याचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादाच्या भुलीचे इंजेक्शन हा समस्येवरचा कायमचा उपाय नाही, तर ती भूल आहे, हे लक्षात येत नाही. अमेरिकेने उघडउघड इस्त्राईलची बाजू घेतली असून इस्त्राईलला संरक्षणाचा अधिकार असल्याची भूमिका घेतली आहे. भारतासह अन्य देशांनी इस्त्राईलला शांततेने आणि सबुरीने प्रश्‍न सोडविण्याचा सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या तातडीच्या बैठकीतही इस्त्राईलला सबुरीचा सल्ला दिला आहे; परंतु इस्त्राईल ते ऐकायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांशी करार करून इस्त्राईलशी संबंध व्यापक करण्याचे पाऊल उचलण्यात आले; परंतु आता इस्लामिक राष्ट्रांनी घेतलेली भूमिका पाहता इस्त्राईलविरोधात सर्व मुस्लिम राष्ट्रे एकत्र यायला लागली आहे. जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत सुरू झालेल्या वादाची झळ आता थेट गाझापर्यंत पोहचते आहे. यानंतर पॅलेस्टाईनच्या सशस्त्र इस्लामिक कट्टरपंथी संघटना हमासनेदेखील इस्त्राईलवर रॉकेट हल्ले करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ले होत आहेत. रॉकेट हल्ल्यांमध्ये आतापर्यंत गाझात 14 मुलांसह 65 लोकांचे मृत्यू झाले. दुसरीकडे इस्राईलमध्येदेखील सात लोकांचा मृत्यू झाला. एका वाहिनीची पत्रकार तेथील संघर्षाचे वृत्तांकन करीत असताना थेट तिच्याजवळून रॉकेट गेले. हा थरार कॅमेर्‍यात कैद झाला. सात तारखेला रात्री उशिरा मुस्लिम धर्माचे पवित्र स्थळ मानल्या जाणार्‍या अल-अक्सा मशिदीपासून सुरू झाला. रमजानचा शेवटचा जुम्मा होता. या वेळी इस्राईलच्या पोलिसांनी मशिदीत छापेमारी केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर पोलिस आणि मुस्लिम नागरिकांमध्ये झडप झाली. यानंतर इस्राईलच्या पोलिसांनी दगडफेक करणार्‍या पॅलेस्टाईनच्या आंदोलकांवर रबर बुलेट्स आणि स्टेन ग्रेनेडचा वापर केला. याबाबत अनेक फोटो आणि व्हिडीओ ’सोशल मीडिया’वर व्हायरल झाले. हा वाद जमिनीच्या एका तुकड्यावरुन झाला. या घटनेनंतर इस्राईलचे संबंध ज्या देशांसोबत सुधारताना दिसत होते ते बिघडले आहेत. तुर्कस्तान आणि पाकिस्तानने इस्राईलच्या कारवाईचा निषेध केला आहे.

मुस्लिम धर्मात तीन सर्वांत पवित्र स्थळे आहेत. यातील दोन मक्का आणि मदिना सौदी अरेबियामध्ये आहेत. उर्वरीत एक जेरुसलेममधील अल-अक्सा मशिद आहे. ही मशिद जुन्या जेरुसलेमचा भाग आहे. हे तेच ठिकाण आहे, ज्यावर मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि यहुदी असे तिन्ही धर्म आपले असल्याचा दावा करतात. जेरुसलेम या जुन्या शहराची धर्माच्या आधारावर विभागणी करण्यात आली. याच्या मुस्लिम भागात अल-अक्सा मशिद आणि डोम ऑफ द रॉक आहे. ईसाई विभागात एक चर्च आहे आणि यहुदी भागात विलिंग वॉल आहे. येथे यहुदी धर्माच्या प्राचीन मंदिराचे अवशेषही आहेत. हे ठिकाण सीमेपासून अगदी जवळ आहे. यावर इस्राईल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देश दावा करतात. सध्या या ठिकाणचे नियंत्रण इस्राईलकडे आहे. त्यामुळेच अनेक पॅलेस्टाईन नागरिक सीमा पार करुन अल-अक्सापर्यंत येऊ शकतात. या ठिकाणी सर्व धर्माचे नागरिक आपआपल्या ठिकाणी प्रार्थना करतात. जेरुसलेमच्या जुन्या शहराजवळ एक शेख जर्राह नावाचे शहर आहे. येथे बहुतांश पॅलेस्टाईनचे नागरिक आहेत; मात्र ही जागा कुणाच्या मालकीची यावरुनच वाद सुरू झाला. अनेक दशके इस्राईलच्या सर्वोच्च न्यायालयात यावर एका याचिकेची सुनावणी सुरू आहे. यावर निकाल देताना न्यायालयाने या ठिकाणी राहणार्‍या पॅलेस्टाईनच्या नागरिकांना हटवण्याचे आणि त्याऐवजी इस्राईलच्या नागरिकांना वसवण्याचे आदेश दिले. यावरुनच पॅलेस्टाईन आणि अन्य मुस्लिम देश संतापले आहेत. त्यातच रमजानच्या महिन्यात पॅलेस्टाईनचे लोक नमाज पठणासाठी अल-अक्सा मशिदीत आले होते. त्या वेळी हा वाद उफाळला. मशिदीच्या परिसरात असलेल्या नागरिकांमधील काहींनी इस्राईलच्या पोलिसांवर दगडफेक केल्याचा, फटाके फोडत पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप होतो. यानंतर इस्राईलच्या पोलिसांनी मशिदीत घुसून कारवाई केली. अनेक लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर हा वाद पेटला. याला प्रत्युत्तर देताना हमासने इस्राईलवर रॉकेट हल्ले केले. हे हल्ले प्रतिहल्ले अजूनही सुरूच आहे. यात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

इस्त्रायलची आयर्न डोम सिस्टम ही जगातील सर्वोत्कृष्ट क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ही एक प्रणाली आहे, जी कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून संपूर्ण शहर वाचवू शकते. या व्यवस्थेमध्ये रॉकेट्स, मोर्टार शेल, यूएव्ही आणि क्षेपणास्त्रे हवेत सोडले जाऊ शकतात. हेच कारण आहे, की हमासने इस्त्रायलच्या दिशेने 300 हून अधिक गोळे फेकले, त्यापैकी केवळ एक डझन जमिनीवर पडू शकले. इस्रायलने 2006 मध्ये या प्रणालीवर काम सुरू केले. जेव्हा इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्ध चालू होते आणि दहशतवादी हिज्बुल्ला संघटनेने इस्रायलच्या शहरांमधील लेबनीज भूमीवरुन हजारो गोळे फेकले होते, ज्यामुळे इस्रायलचे बरेच नुकसान झाले, यानंतर, आयर्न डोम सिस्टमचा शोध लागला. 

COMMENTS