Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतापगड येथे शिवप्रताप दिन उत्साहात साजरा : छत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव

सातारा / प्रतिनिधी : ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुतार्‍या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन

जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप
पानवळवाडी येथे वटपौर्णिमेच्या दिवशीच विधवा प्रथेविरुध्द क्रांतीकारक निर्णय
वाजेगाव निंबळकमध्ये अवैध गुटखा जप्त

सातारा / प्रतिनिधी : ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुतार्‍या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणार्‍या भगव्या ध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुतार्‍या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
आई भवानीची आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, दरे, वाडाकुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम-तुतार्‍या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणार्‍या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
पालखीचे शिवरायांच्या अश्‍वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करुन भक्तीभावे पूजन करण्यात आले. यावेळी ’क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज,’ या ललकारीने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. शिवपुतळ्यासमोरील चबुतर्‍यावरील भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी पाटील यांनी केले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर संभाजी जाधव आणि सहकार्‍यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.
छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुर्‍हाडबाजी, अग्निचक्र, गनिमी कावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, महाबळेश्‍वर तहसिलदार सचिन मस्के, वाडाकुंभरोशीच्या सरपंच ज्योती सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS