अहिल्यानगर : तपोवन रोडवरील “बालघर प्रकल्प” येथे दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा उपक्रम “नगर जल्लोष” (ट्रस्ट) आणि हॉटेल “ब्रम्हा भोज” यांच्या वतीने
अहिल्यानगर : तपोवन रोडवरील “बालघर प्रकल्प” येथे दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा उपक्रम “नगर जल्लोष” (ट्रस्ट) आणि हॉटेल “ब्रम्हा भोज” यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. समाजातील उपेक्षित, निराधार आणि वंचित बालकांसाठी दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा करून समाजात आनंद, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देण्याचा हा प्रयत्न ठरला.
या कार्यक्रमात बालघर प्रकल्पातील सर्व मुलांना ब्रम्हा भोजच्या वतीने दिवाळीचा भरपूर फराळ तर नगर जल्लोष परिवाराच्या वतीने समाज सहभागातून फटाके व भेटवस्तू देण्यात आल्या. याचे वितरण मा.श्री.संजयजी शिंगवी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.गुंजनजी शिंगवी,श्री.लौकिकजी शिंगवी, सल्लागार समिती प्रमुख श्री.सुहासभाई मुळे, ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा,खजिनदार दिपक गुंडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलाराम,ओंकार मुनगेल,गिरीश मुदिगंटी,सौ.पल्लवी बोगा व सौ.ऐश्वर्या मुदिगंटी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांच्या उजेडात बालघर प्रकल्पा कडून युवराज गुंड यांच्या प्रस्तविकाने करण्यात आली. बालकांनी ‘आमची दिवाळी’ अंतर्गत उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन, तोंडभरून स्वागत करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आवडता खाऊ आणि फोडायला फटाके पाहून लहानगे हरखून गेले. कार्यक्रम झाल्यावर लगेच फटाके फोडून फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला. मुलांच्या चेहऱ्यांवरील हसू आणि आनंदाचे भाव पाहून उपस्थित मान्यवरही भारावून गेले.
प्रमुख पाहुणे श्री.संजयजी शिंगवी यांनी या वेळी मुलांना शुभेच्छा देत सांगितले, “समाजातील प्रत्येक घटकाने या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी एक पाऊल उचलले, तर खरी दिवाळी सर्वांसाठी उजळेल.
नगर जल्लोष ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.गुंजनजी शिंगवी यांनी सांगितले की, “दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे प्रकाश देणे — आणि तोच प्रकाश आज या बालकांच्या आयुष्यात आणण्याचा आमचा लहानसा प्रयत्न आहे. या उपक्रमात ब्रम्हा भोज, नगर जल्लोष ट्रस्टचे सदस्य आणि बालघर प्रकल्पातील युवराज गुंड व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
बालघरातील गुरूमाऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी बालकांसोबत फराळाचा आस्वाद घेत एकत्र दिवाळी साजरी केली. या सुंदर उपक्रमामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत ‘आनंद वाटा, प्रकाश पसरवा’ हा दिवाळीचा संदेश पोहोचला असून, नगर जल्लोष ट्रस्ट आणि ब्रम्हा भोज यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक सर्वत्र होत आहे.

COMMENTS