Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्षण हाच रयतचा धर्म : प्रा. इंद्रजीत भालेराव

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरासातारा / प्रतिनिधी : शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दि

घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक
चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
सातारा / प्रतिनिधी : शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास हे रयत शिक्षण संस्थेचे उद्दिष्ट आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट शंभर वर्षानंतरही तसूभर बदलले नाही. रयत शिक्षण संस्था ही अशा प्रकारची महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. स्थापनेपासून आजही शिक्षण हाच ’रयत’चा धर्म राहिला आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या 106 व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, कर्मवीर कुटुंबीय, संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, जे. के. जाधव, प्रभाकर देशमुख, सदाशिव कदम, भैय्यासाहेब जाधव, अरुण पवार, प्रशांत पाटील, यशवंत पाटणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. भालेराव म्हणाले, रयत शिक्षण संस्था ही गुणवत्तेला प्राधान्य देणारी संस्था आहे. स्थापनेपासून आजअखेर मूळ उद्देशानुसार चालणारी ही संस्था होय. महाराष्ट्रातील पुरोगामी समाज सुधारकांची एकत्रित सत्वे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यात होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन शिक्षण संस्थेला ’रयत’ हे नाव दिले. देशाच्या विकासासाठी दृष्टी देणारे नेतृत्व रयतकडे आहे. कर्मवीरांनी शिक्षणाला श्रमाची जोड दिली. कर्मवीर ही पदवी जनतेच्या मुखातून आली आहे. आज रयत शिक्षण संस्थेत जागतिक पातळीवरील उपक्रम सुरू आहेत. यावेळी त्यांनी विविध गाजलेल्या कविता सादर केल्या. ’बाप’, ‘जन्म’, ’गावकडं चल माझ्या दोस्ता’ या कवितेवर उपस्थित विद्यार्थ्यांनी ठेका धरला.
याप्रसंगी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीबाबतची माहिती दिली. संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान देणार्‍या व्यक्तींच्या स्मरणार्थ उपक्रमशील शाखा, उपक्रमशील शिक्षक, लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, प्राचार्य, आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनी, विज्ञान शिक्षक, कार्यक्षम गुरुकुल प्रमुख इत्यादी पुरस्कार देण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्तशिक्षिकेचासत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. कार्यक्रमास उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, अ‍ॅड. दिलावर मुल्ला आदी उपस्थित होते. सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाससंस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सभासद, आजीव सेवक, विविध शाखांचे शाखा प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS