Homeताज्या बातम्यासंपादकीय

तर, सामाजिक रोषाला सामोरे जावे लागेल !

   गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणात एका विषयावर वादंग उठले आहे. हे वादंग प्रसार माध्यमांपासून तर, सामाजिक चळवळीपर्यंत आणि

मशीराने धरला रमजानचा उपवास
मुळाच्या पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार लवकरच
समीर वानखेडेवर प्रश्नचिन्ह म्हणजे संविधान आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह (Video)

   गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणात एका विषयावर वादंग उठले आहे. हे वादंग प्रसार माध्यमांपासून तर, सामाजिक चळवळीपर्यंत आणि सामाजिक चळवळीपासून तर, आरएसएस पर्यंत, अशा सर्व क्षेत्राला व्यापून राहिलेले आहे. खरे तर, या वादावर लिहिण्याची आमची काही इच्छा नव्हती; परंतु, जेव्हा महाराष्ट्राच्या प्रमुख समाज जीवनालाच हा वाद घेरतो, तेव्हा त्याविषयी आपण तटस्थ राहू शकत नाही! त्यावर निश्चितपणे आपलं काहीतरी मत नोंदवलं पाहिजे, या भूमिकेतूनच आज या विषयावर लिहीत आहे. रा. सू.‌ गवई हे महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणातील एक मोठं नाव. परंतु, त्यांच्यावर सारखा आरोप राहिला की, ते कायम काँग्रेसच्या सोबत आपला राजकीय घरोबा ठेवून विविध राजकीय सत्ता प्राप्त करीत राहिले, आणि आजीवन ते सत्तेत राहिले. त्यांच्या पक्षाचा एक आमदार जरी निवडून आला नाही तरी,  स्वतः रा. सू. गवई हे कायम सत्तेवर राहिले. हा त्यांच्यावर आंबेडकरी समाजाचा आरोप राहिलेला आहे. मात्र, आता त्यांच्या या पद भूषवण्यावरून नव्हे, तर, त्यांच्या पत्नी कमलताई गवई यांच्या संदर्भात हा वाद उसळला आहे. वादाचे कारण असं की, ५ ऑक्टोबरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्या कार्यक्रमाला कमलताई गवई यांना मुख्य अतिथी म्हणून बोलावले आहे. अर्थात, या संदर्भात नेमकी त्यांची भूमिका काय आहे, हे अद्यापही प्रसार माध्यमातून स्पष्ट झालेलं नसलं तरी, त्यांच्या संघाच्या कार्यक्रमात जाण्याच्या भूमिकेवर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.  प्रसारमाध्यमांनी त्यांच्या या मुख्य अतिथी म्हणून जाण्याला एक बातमी म्हणून त्याची नोंद घेतली. मात्र, प्रत्यक्षात  यावर वादंग उभे राहिलं आणि त्यांच्या भूमिकेचे एक पत्रक समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. त्या पत्रकाला घेऊन देखील आघाडीच्या दैनिकांनी आणि चॅनल्सने बातम्या बनवल्या आणि कमलताई गवई या कार्यक्रमाला जाणार नाहीत, अशा आशयाचे ते पत्र खरं असल्याचं सांगितलं. मात्र, अवघे २४ तास उलटत नाही, त्याच्या आधीच ते पत्रक फेक असल्याचं स्वतः डॉक्टर राजेंद्र गवई जे कमलताई गवई यांचे मोठे चिरंजीव आहेत. त्यांनी हे पत्र फेक असल्याचं समाज माध्यमांमध्ये सांगून, आपल्या आईने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं म्हटले आहे. त्या जो कोणता निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी मी त्यांच्या मागे ठाम राहील. ही भूमिका त्यांनी घेतली. रा. सू. गवई यांच्या पश्चात कमलताई गवई यांच्या भूमिकेवरून उसळलेला हा वाद म्हणजे एका रात्रीत कमलताई यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्रव्यापी करून देण्यात मोठे वरदान ठरलं. याचा परिणाम जर त्यांनी या संदर्भात ठोस भूमिका घेतली तर, त्यांच्या कुटुंबातील राजकीय पक्षाला याचा थेट बेनिफिट होऊ शकतो.  मात्र एक गोष्ट यातून पुढे आलेली दिसते की, एरवी कमलताई गवई यांचं नाव अमरावती सोडले तर, उभ्या महाराष्ट्राला माहीत असण्याचे काही कारण नव्हतं. परंतु, या वादंगाणे कमलताई गवई यांचं नाव महाराष्ट्रात घराघरात पोहोचले.  त्यामुळे कदाचित ज्या डॉ. राजेंद्र गवई यांना रा. सू. गवई यांच्यानंतर राजकीय पक्षाची धुरा सांभाळावी लागली. परंतु, महाराष्ट्रात आपला जम त्यांना बसवता आला नाही. तर, आईच्या नावाने हा जम बसू शकेल का, ही पडताळणी देखील कदाचित याच्यामागे असू शकेल. एकंदरीत संघाने दिलेल्या निमंत्रणावरून खासकरून आंबेडकरी समाजामध्ये ज्या तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत, यातून समाजामध्ये आजही डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना किती महत्त्व आहे,  ही गोष्ट अधोरेखित होते. कोणतीही चळवळ विचारांशिवाय पुढे नेता येत नाही. व्यवहार हा राजकारणात करावा लागत असला तरी, तो आपले विचार शाबूत ठेवून करावा लागतो. केवळ, एखादं संघटन व्यक्तीला जर बोलवत असेल तर, व्यक्ती म्हणून ती प्रभाव निर्माण करू शकत नाही. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ज्याही लोकांना बोलावलं आहे, त्यांना आपली स्वतःची भूमिका संघाशी मतभेद ठेवून मांडता आलेली नाही. अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रपती पदावर असताना प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमातली वर्णी ही देखील वादाची विषय ठरली होती. मात्र, आपण संघाच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणू, असा जो अति आत्मविश्वास दिवंगत प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला होता; त्यामध्ये त्यांना ही काही करता आलं नाही. यावरून आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एखाद्या व्यक्तीच्या तात्कालीक विचार मांडण्यावरून आपल्यात बदल घडवू शकते, अशा प्रकारचा विचार येणं हेच मुळात हास्यास्पद आहे. ज्या संघटनेला १०० वर्षे होऊन त्यांच्या विचारांचा व्यवहार निर्माण करण्यात ते अधिक सक्रिय असतात, अशा संघटनेला एखाद्या व्यक्तीच्या भाषणाने बदलवता येऊ शकतं, हा आत्मविश्वासच मुळात हास्यास्पद आहे! त्यामुळे कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारून त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तरी, त्यांना कोणताही प्रभाव तिथे निर्माण करता येणार नाही. याउलट ज्या आंबेडकरी समाजाच्या जीवावर त्यांच्या कुटुंबाने सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवली आहे; त्या आंबेडकरी विचारांच्या सोबत त्यांनी अधिक निर्धारपूर्वक राहणं हे आंबेडकरी समाजाला अपेक्षित आहे. मात्र, जर यात गवई कुटुंबाने आतताईपणा केला तर, त्यामध्ये आंबेडकरी समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागेल. अर्थात, गवई कुटुंबाला याचे भान असेल की नसेल हा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु, जर त्यांनी हा आतताईपणा केला तर निश्चितपणे भावी काळात याचे त्यांना सामाजिक परिणाम भोगावे लागतील, यात मात्र शंका नाही.

COMMENTS