युद्धविराम किती काळ टिकणार?

Homeसंपादकीय

युद्धविराम किती काळ टिकणार?

गाझा पट्टीत वारंवार संर्घष होतो. वारंवार शस्त्रसंधी होते. ही शस्त्रसंधी किती काळ टिकते, हे कुणीच सांगत नाही. आताही गाझापट्टीत संघर्षाला 11 दिवसांनी विराम मिळाला असला, तरी शस्त्रसंधी किती काळ टिकते, यावर यावर तिचं महत्त्व अवलंबून आहे.

विक्रमासाठी सारं काही!
ब्राह्मणांना दुसरा देश कसा देणार ?
विवेकाचा नंदादीप पेटत राहो !

गाझा पट्टीत वारंवार संर्घष होतो. वारंवार शस्त्रसंधी होते. ही शस्त्रसंधी किती काळ टिकते, हे कुणीच सांगत नाही. आताही गाझापट्टीत संघर्षाला 11 दिवसांनी विराम मिळाला असला, तरी शस्त्रसंधी किती काळ टिकते, यावर यावर तिचं महत्त्व अवलंबून आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धबंदी म्हणजे भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी करारासारखीच आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये जसं विळ्याभोपळ्याचं नातं आहे, तसंच नात इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये आहे. पॅलेस्टाईनचं अस्तित्वच इस्त्रायला मान्य नाही. 


या दोन्ही देशांत कायम सतत तणाव असतो. भारत आणि पाकिस्तानात युद्धबंदी करार आणि शस्त्रसंधी करार असला, तरी पाकिस्तान वर्षांतून चार हजार वेळा तरी शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करीत असतो. तसंच इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गेल्या दोन दशकांत चार वेळा वेगवेगळे करार झाले; परंतु त्यानंतर प्रत्येक वेळी दोन्ही देशांत वारंवार खटके उडाले. त्यामुळं आता झालेल्या कराराकडंही साशंकतेनं पाहिलं जात आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला 11 दिवसानंतर विराम मिळाला. पूर्व जेरुसलेम शहरात इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून तणाव होता. त्याचं पर्यवसान दोघांसाठीही पवित्र मानल्या जाणार्‍या स्थळाजवळ झालेल्या चकमकीत झालं. सात मे पासून सुरू झालेली चकमक वीस तारखेपर्यंत सुरू होती. अल-अक्सा मशिदीजवळ ज्यू आणि अरब यांच्यात चकमक झाली. त्यानंतर दोनच दिवसांत दहा मेपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायलनं पवित्र ठिकाणावरून माघारी जावं, असं आवाहन करत हमासनं रॉकेट हल्ल्याला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनं मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. हमासच्या नियंत्रणात असलेल्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या हिंसक संघर्षात गाझापट्टीत कमीत कमी 232 जणांचा मृत्यू झाला. यात शंभर महिला आणि मुलांचाही समावेश आहे, तर गाझापट्टीत ठार झालेल्यांमध्ये हमासचे कमीत कमी दीडशे अतिरेकी असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे; मात्र हमासचे किती लोक ठार झाले, याची अधिकृत आकडेवारी हमासनं दिलेली नाही. हमासच्या रॉकेटहल्ल्यात दोन लहान मुलांसह एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायलच्या वैद्यकीय सर्व्हिसकडून सांगण्यात आलं. गाझापट्टीतून हमासच्या लोकांनी इस्रायलवर चार हजार रॉकेट्स डागल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे. यातील पाचशेहून अधिक रॉकेट्स गाझापट्टीतच कोसळलं तर इस्रायलमध्ये आलेल्या रॉकेट्सपैकी 90 टक्के रॉकेट्स क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेनं पाडल्याचं इस्रायलनं सांगितलं.     इस्रायलच्या राजकीय सुरक्षा मंत्रिमंडळानं युद्धबंदीसाठीची शिफारस एकमतानं मंजूर केली. तिकडं इस्रायलनं केलेली युद्धबंदीची घोषणा म्हणजे पॅलेस्टिनी जनतेचा ’विजय’ आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा ’पराभव’ आहे, अशी प्रतिक्रिया हमासच्या एका अधिकार्‍यानं दिली आहे. नेत्यानाहू यांच्यावर देशातूनही टीका होत असली, तरी दोन्हींनी अधिक ताणून न धरता आणि टीकेची पर्वा न करता केलेली शस्त्रसंधी महत्त्वाची असून पूर्वानुभव घेता ती किती काळ पाळली जाईल, याबाबत मात्र शंका आहे. त्याचं कारण युद्धबंदीच्या घोषणेनंतर काही मिनिटांतच इस्रायलच्या दक्षिण भागात गाझावरून रॉकेटहल्ला झाल्याची धोक्याची सूचना देणारे सायरन वाजले, असं इस्रायलच्या सैन्यानं म्हटलं आहे, तर गाझामधल्या पॅलेस्टिनी माध्यमांनी या भागात ताजे हवाई हल्ले झाल्याची माहिती दिली. अमेरिकेनंही या युद्धबंदीचं स्वागत केलं असून अध्यक्ष जो बायडेन यांनी नेत्यानाहू यांच्यांशी चर्चा केली. इस्रायलमधल्या निष्पापांचे बळी घेणार्‍या हमास आणि गाझामधील इतर अतिरेकी संघटनांकडून करण्यात येणार्‍या अंदाधुंद रॉकेट हल्ल्यापासून स्वसंरक्षणाचा इस्रायलला पूर्ण अधिकार आहे आणि अमेरिकेचा याला संपूर्ण पाठिंबा आहे, असं अमेरिका अगोदरपासून म्हणत आली आहे. इस्त्रायलच्या विरोधात उतरलेल्या मुस्लिम राष्ट्रांतही कमालीचे मतभेद झाले होते. इस्रायलच्या आयर्न डोम या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेनं हमासचे हजारो रॉकेट्स निकामी केले. अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांनी मिळून ही यंत्रणा विकसित केली आहे. अगणित इस्रायली ज्यू आणि अरब नागरिकांचे प्राण वाचवणार्‍या आणि दोन्ही देशांनी मिळून तयार केलेल्या आयर्न डोम यंत्रणेचं नेत्यानाहू यांनी कौतुक केलं. संघर्षात अपरिमित मनुष्यहानी होण्याआधीच इजिप्तचे अध्यक्ष अल-सिसी यांनी युद्धबंदीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्यांना यश आलं. गाझामध्ये मानवतावादी मदत पुरवणं आणि पुनर्निमाणासाठीचे प्रयत्न करणं, यासाठी संयुक्त राष्ट्रांसोबत काम करण्यास अमेरिका वचनबद्ध असल्याचंही बायडन यांनी म्हटलं आहे. यासाठी हमास नाही तर पॅलेस्टिनी अथॉरिटीसोबत संपूर्ण सहकार्य करू, असंही त्यांनी सांगितलं. त्यांची ही भूमिका रास्तच आहे. मध्य पूर्वेतील या संघर्षामुळं जग अस्वस्थ होतं. जगातून हा संघर्ष थांबवण्यासाठी दबाव होता. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांवरही संघर्षविरामासाठी आंतरराष्ट्रीय दबाव होता. बुधवारीच अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी फोनवरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी बातचीत करत युद्धबंदी करता यावी, यासाठी गाझापट्टीतील संघर्षात भरीव घट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदीची चर्चा घडवून आणण्यासाठी इजिप्त, कतार आणि संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी युद्धबंदीचे प्रयत्न करण्यासाठी इस्रायलमध्ये दोन सुरक्षा प्रतिनिधी मंडळही पाठवलं होतं. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी गट हमास यांच्यातील संघर्षाला 11 दिवसांनंतरच्या शस्त्रसंधीमुळं पूर्णविराम मिळाला आहे. दोन्ही बाजूंकडून ठराविक काळासाठी किंवा अनिश्‍चित काळासाठी आक्रमण केलं जाणार नाही, अशी घोषणा म्हणजे शस्त्रसंधी. हा आता हा करार झाला, तरी इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा इतिहास बघता ही धुमश्‍चक्री केव्हाही पुन्हा सुरू होऊ शकते. दोन्ही बाजूंनी शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दोन वाजता आक्रमण थांबवण्याचा निर्णय घेतला. इस्रायलतर्फे गाझात हवाई हल्ले आणि इस्रायलमध्ये रॉकेट्स दागण्याच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. शस्त्रसंधीसाठी दोन्ही बाजूंतर्फे कोणत्या अटी मान्य करण्यात आल्या याविषयी जुजबी माहिती देण्यात आली, कारण वाटाघाटी पडद्यामागं झाल्या. परस्पर सामंजस्यानं संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेत असल्याचं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. इस्रायल जेरुसलेम शहरातील मुस्लिम धर्मीयांसाठी अतिशय पवित्र अशा अल-अक्सा मशिदीवरील ताबा सोडणार आहे. तसंच शेख जराह या जिल्ह्यात पॅलेस्टाईन नागरिकांना घरातून बाहेर काढलं जात आहे. दरम्यान, इस्रायलनं या म्हणण्याचं खंडन केलं आहे. हेच दोन मुद्दे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचं कारण ठरलं होतं. गाझा पट्टीत हवाई हल्ल्यांनी निर्णायक यश मिळवलं असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलं. या हल्ल्यांमुळं हमासनं भूमिकेत बदल केला असंही त्यांनी सांगितलं. मानवतेच्या दृष्टिकोनातून केली जाणारी मदत पोहोचावी यासाठी गाझा पट्टीत जाण्यासाठीचा मार्ग खुला करणार असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इस्रायलमध्ये आणीबाणीसदृश परिस्थितीत जाण्यायेण्यावरील निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. लवकरच विमानसेवा सुरू होईल. शस्त्रसंधी किती काळासाठी असेल अशी वेळेची सीमा ठरलेली नाही; मात्र ही शस्त्रसंधी अनिश्‍चित काळ चालेल, असं दोन्ही बाजूच्या नेत्यांनी म्हटलं आहे. शस्त्रसंधीचा आढावा घेण्यासाठी इजिप्त एक शिष्टमंडळ तेल अविवला तर दुसरं गाझा येथे पाठवणार आहे. ही शिष्टमंडळु कायमस्वरुपी तिथंच तैनात करण्याचा इजिप्तचा मानस आहे. शस्त्रसंधीमुळं खर्‍या अर्थानं विकासाची दारं खुली झाली आहेत, असं बायडेन यांनी म्हटलं आहे. इजिप्त, संयुक्त राष्ट्र संघटना, अमेरिका आणि अन्य देशांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या प्रयत्नांची युरोपीय संघानं प्रशंसा केली आहे. शस्त्रसंधी लवकरात लवकर लागू व्हावी असं चीननं म्हटलं आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शस्त्रसंधीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दोन्ही बाजू या संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. गेले काही वर्षे या संघर्षावर तोडगा काढण्याचं प्रयत्न सुरू आहेत; मात्र या प्रयत्नांना यश मिळू शकलेलं नाही. जेरुसलेमचं भविष्यातील स्थान, वेस्ट बँक परिसरातील ज्यू रहिवाशांचा मुद्दा, पॅलेस्टाईन निर्वासितांचा प्रश्‍न, पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता मिळणार का असे मुद्दे आहेत.

COMMENTS