नवी दिल्ली : सौर ऊर्जा, पवन, हायड्रोजन आणि बॅटरी साठवणूक क्षेत्रात भारताच्या क्लीनटेक मूल्य साखळी वाढवण्याकरता रचना केलेल्या भारत क्लीनटेक उत्पाद
नवी दिल्ली : सौर ऊर्जा, पवन, हायड्रोजन आणि बॅटरी साठवणूक क्षेत्रात भारताच्या क्लीनटेक मूल्य साखळी वाढवण्याकरता रचना केलेल्या भारत क्लीनटेक उत्पादकता मंचाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्लीत भारत हवामान मंच 2025 मध्ये अनावरण झाले. उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन (पीएलआय) आणि अनुदाने स्वच्छ ऊर्जा क्षेत्राच्या दीर्घकालीन वाढ आणि विकासासाठी हानिकारक आहेत, असे गोयल यावेळी संबोधित करताना म्हणाले. पीएलआय योजना ही केवळ या क्षेत्राच्या आरंभीच्या टप्प्यासाठी हितावह आहे मात्र स्वच्छ हवा क्षेत्राने स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. क्लीनटेक क्षेत्राने सरकारवर अवलंबून न राहता आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वानी नवकल्पनांचा विचार करावा आणि देशातील उत्पादनाचे प्रमाण वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. भारत क्लीनटेक उत्पादकता मंचामुळे भारतीय कंपन्यांना सहकार्य करण्याची, एकत्रितपणे नवकल्पना राबवण्याची संधी प्राप्त होईल, वित्तपुरवठा, कल्पना, तंत्रज्ञान आणि संसाधने सामायिक करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात मदत होईल. यामुळे भारताला एक आकर्षक व्यवसायिक आणि शाश्वतता आणि क्लीनटेक क्षेत्रात जागतिक नेता बनण्यास मदत होईल. देशात 2030 पर्यंत 500 गिगावॅट क्षमतेचे स्वच्छ ऊर्जा स्रोत उभारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टाला साध्य करण्यात उपस्थित असलेले सहभागी यशस्वी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांचा आराखडा आणि पॅरिस कराराअंतर्गत सादर केलेल्या राष्ट्रीय निर्धारीत योगदानाची पूर्तता करण्याच्या बाबतीत भारत सर्वोत्तम कामगिरी करणार्या देशांपैकी एक आहे. आपण आपले उद्दिष्ट मुदतीआधी गाठण्यासाठी सज्ज आहोत. आपण वर्ष 2022 मध्ये अक्षय किंवा स्वच्छ ऊर्जा स्रोत उभारण्याचे आपले उद्दिष्ट निर्धारित कालावधीच्या आठ वर्षांच्या आधीच पूर्ण केले आहे. 200 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मिती स्रोत उभारण्याचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आता आपण 500 गिगावॅट क्षमतेचे स्वच्छ ऊर्जा स्रोत उभारण्यासाठी सज्ज आहोत, भारताकडे जगातील सर्वात मोठे इंटरकनेक्टेड अर्थात एकमेकांशी जोडलेले ग्रिड आहे, असे ते म्हणाले. हवामान बदलतील आव्हानांचा सामना करणे हे भारतासाठी नवे नाही असे सांगून सौर ऊर्जा स्वीकारणारे गुजरात हे पहिले राज्य होते, असे त्यांनी सांगितले. देशातील परवडणारी सौरऊर्जा, धोरणांमधील पारदर्शकता, प्रामाणिक लिलाव प्रक्रिया आणि समान स्पर्धा प्रदान करणे तसेच अंमलबजावणीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवणे याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारने अक्षय ऊर्जा कार्यक्रमासाठी 3ड – वेग, प्रमाण आणि कौशल्याचा अवलंब केला असे गोयल यांनी अधोरेखित केले.
COMMENTS