Homeताज्या बातम्यासंपादकीय

विरोधकांचा मवाळ सूर !

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीत सत्तेत येणार असा संपूर्ण विश्‍वास आघाडीच्या नेत्यांचा होता. त्यामुळेच निवडणुकीआधीच मुख्यमं

महाराष्ट्रातही जातीनिहाय जनगणना होणार का ?
नोकर भरतीला होणारा विलंब
राष्ट्रवादीच्या तलवारी म्यान

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाविकास आघाडीत सत्तेत येणार असा संपूर्ण विश्‍वास आघाडीच्या नेत्यांचा होता. त्यामुळेच निवडणुकीआधीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा अशी गळ घातली जात होती. मात्र निवडणुकीनंतर महायुतीचे पीक जोमाने आले तर, महाविकास आघाडीचे पीक भुईसपाट झाले. खरंतर हा पूर्वइतिहास मांडण्याचे मुख्य कारण म्हणजे महाविकास आघाडी ज्या त्वेषाने महायुतीवर टीका करत होती, ती टीकेची धार आता राहिली नाही. कारण ठाकरे गटातील नेत्यांनी तलवार म्यान केली असून, खासदार शरद पवार यांच्या गटातील नेत्यांनी देखील तलवार म्यान केली आहे. तर दुसरीकडे काँगे्रसचे एक-दोन नेते सोडले तर सर्वांचा सूर हा मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत एकतर तू राहशील किंवा मी राहील असा निर्वाणीचा इशारा दिला होता, मात्र तेच उद्धव ठाकरे नागपुरात हिवाळी अधिवेशनात मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले होते. ती भेट कशासाठी होती, हा भाग वेगळा, मात्र त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते आजपर्यंत बघितल्यास ठाकरे गटाची भूमिका मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यास ठाकरे गटाने सुरूवात केली आहे, मात्र यावेळी भाजपवर किंवा त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांवर कडवी टीका करण्याचे त्यांनी टाळल्याचे दिसून येत आहे. याशिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांसमोर येवून भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर शिवराळ भाषेत टीका करत होते, मात्र तीही हल्ली दिसत नाही, त्यामुळे विरोधकांचा मवाळ सूर झाल्याचे दिसून येत आहे. खरंतर खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील खासदार तर कुठेच दिसत नाही. अन्यथा निवडणुकीच्या काळात या खासदारांचा आक्रमक पवित्रा होता, मात्र हेच आमदार आता अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येण्याची भाषा करू लागले आहेत, तसे होत नसेल तर, त्यांनी शेवटचा पर्याय म्हणजे अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा देखील ठेवल्याचे दिसून येत आहे. या घडामोडी आत्ताच घडणार नसल्या तरी पुढील काही महिन्यात त्या घडू शकतात, मात्र यानिमित्ताने शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांचा सूर मवाळ झाल्याचे दिसून येत आहे. बीड येथील मस्साजोग प्रकरणात ज्या आमदारांनी तीव्र हल्ला केला त्यात भाजपचे आमदार सुरेश धस अग्रेसर असल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंड यांच्यावर तीव्र टीका केली किंवा जहाल भूमिका घेतली असे म्हणता येणार नाही. कारण मंत्री मुंडेंविरोधात सर्वाधिक आक्रमक पवित्रा अगोदर भाजपचे आमदार सुरेश धस यांनीच घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षातील आमदारांची टीकांची इतकी तीव्रता दिसून येत नाही. खरंतर लोकशाहीमध्ये विरोधकांनी नेहमी सरकारच्या ध्येय-धोरणांवर लक्ष ठेवून सजग राहण्याची गरज आहे. संसदेत विरोधक जी आक्रमकता दाखवत आहेत, ती आक्रमकता हिवाळी अधिवेशनात देखील दिसून आली नाही. किंबहून बीड प्रकरण, परभणी प्रकरणी देखील काँगे्रसच्या एक-दोन नेत्यांनी तीव्रतेने प्रश्‍न मांडला, त्याव्यतिरिक्त विरोधक संपले की काय? असाच सूर दिसून येत आहे. निकोप लोकशाहीसाठी विरोधकांची भूमिका अतिशय महत्वाची असते, मात्र त्याचा विसर विरोधकांना पडला असावा. कारण ठाकरे गटाने देखील तुम्ही दहा असा की पाच, पण माझा प्रत्येक आमदार दहा आमदारांना भारी पडेल असे वक्तव्य केले होते, मात्र तो सूर आता मवाळ झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांशी जुळवून घेण्याचे ठरवले आहे, असेच दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ही धार कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत देखील ठाकरे गटाचा टीकेचा सूर बदलण्याची शक्यता आहे. थेट शीर्षस्थ नेत्यांवर टीका करण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना हात घालण्याचे धाडस ठाकरे गट करू शकतो. कारण भाजव्या शीर्षस्थ नेत्यांवर जहरी टीका करणे ठाकरे गटाला भोवल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS