मुंबई :मीरा-भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा-भाईंदर महानगर पालिकेनेफराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे.

मुंबई :मीरा-भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा-भाईंदर महानगर पालिकेनेफराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे. पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांच्या उत्पादनात व्यवसायाशी जोडलेल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायाचा शाश्वत पद्धतीने आणि परिणामकारित्या विस्तार करता यावा या उद्देशाने, अशा महिला उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत या महिला उद्योजकांना सर्वंकष प्रशिक्षण आणि आवश्यक पाठबळ दिलं जाणार आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी मीरा-भाईंदर महानगर पालिकेने नीती आयोगाच्या महिला उद्योजकता मंचासोबत सहकार्यपूर्ण भागिदारी केली असून, महिला उद्योजकता मंचाच्या अवार्ड टू रिवॉर्ड या उपक्रमांतर्गत फराळ सखी या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभही केला आहे. 2018 मध्ये नीती आयोगाअंतर्गत महिला उद्योजकता मंच या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. त्यावेळी माहिती साठ्याचे संकलन करणारा मंच म्हणून निती आयोगाअंतर्गत या उपक्रमाचा अंतर्भाव केला गेला होता. त्यानंतर हा उपक्रम सार्वजनिक खाजगी क्षेत्राच्या भागिदारीअंतर्गत परावर्तीत केला केला. महिला उद्योजकांसंबंधीच्या माहितीतील विषमतेच्या आव्हानावर मात करून महिला उद्योजकांना सक्षम बनवणे आणि त्यासाठी आर्थिक सेवा सुविधांची सुलभ उपलब्धता, बाजारपेठांची उपलब्धता, प्रशिक्षण आणि कौशल्य, मार्गदर्शन आणि संपर्क यंत्रणेचा विस्तार, अनुपालन आणि कायदेविषयक सहाय्य आणि व्यवसाय विकासाशी संबंधित सेवा सुविधा अशा सर्व आवश्यक बाबींबद्दल सातत्यपूर्ण सहकार्य प्रदान करणे हा महिला उद्योजकता मंचाचा उद्देश आहे. महिला उद्योजकांना सणासुदीच्या पारंपरिक खाद्य पदार्थांच्या अर्थात फराळाच्या उत्पादन आणि विक्री प्रक्रियेशी जोडून घेत, त्यांच्यासाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा ‘फराळ सखी’ या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी मीरा भाईंदर महानगर पालिकेने एक केंद्रीकृत स्वयंपाकघर उभारले आहे. या स्वयंपाकघरात बचत गटातील महिलांना असे पदार्थ व्यावसायिक तज्ञतेने बनवण्याची संधी उपलब्ध करून दिली गेली आहे. यासोबतच मीरा भाईंदर महानगर पालिका या महिला उद्योजकांना त्यांच्या फराळाच्या पदार्थांच्या विक्रीसाठीही विशेष जागा उपलब्ध करून देत तसेच महानगर पालिकेच्या वतीने त्यांच्या उत्पादनांचा जाहिरातीद्वारे प्रचार प्रसार करत त्यांना पाठबळही देत आहे. अलिकडेच झालेल्या दिवाळी सणांच्या वेळी या उपक्रमाला लक्षणीय यश मिळाले. उत्तम दर्जाच्या फराळाच्या पदार्थांचा उत्तम दर्जा आणि चव यामुळे दिवाळी सणाच्या काळात 3 टनांपेक्षा जास्त फराळच्या पदार्थांची विक्री झाली होती. आता या उपक्रमाअंतर्गत मिरा भाईंदर मधील 25 महिलांची निवड करून त्यांना व्यवसाय उद्योग संचलनविषयक तात्रिंक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सेंटर फॉर एज्युकेशन, गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी फाऊंडेशनच्या वतीने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे महिला उद्योजकांना शाश्वत उद्योग व्यवसाय स्थापन करण्यासाठीची कौशल्ये आणि ज्ञान आत्मसात करता येईल, आणि या माध्यमातून त्यांना स्थानिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत स्वतःचे योगदानही देता येणार आहे.
COMMENTS