आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक, पाच पोलिस जखमी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेडकर जयंती मिरवणुकीत दगडफेक, पाच पोलिस जखमी

मिरवणुकीस गालबोट, पोलिसांनी दाखल केले सहा गुन्हे, फरार आरोपी शोध सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीस गालबोट लागले व दोन गटात घोषण

जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
जिल्ह्यातील परळी पीपल्स ठेवीदारांच्या आशा पल्लवीत
शनिशिंगणापूर येथील शनि मंदीर भाविकांसाठी खुले

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी नगर शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीस गालबोट लागले व दोन गटात घोषणाबाजीसह तुफान दगडफेक होऊन यात पाच पोलिस जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी सहा गुन्हे दाखल केले असून यात 34 आरोपी आहेत. याशिवाय त्यांचे अन्य अनोळखी साथीदारही असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दिनांक 14रोजी अहमदनगर जिल्हयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. त्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत बर्‍याच मंडळांनी मिरवणूक काढण्याची परवानगी घेऊन मिरवणुका काढल्या. पोलिसांनी मिरवणूक परवानगीसह फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे मिरणुकीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य न करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली होती. या पार्श्‍वभूमीवर, दगडफेक व घोषणायुद्धाच्या दोन घटना घडल्या. तसेच डीजे लावून ध्वनीप्रदूषण केल्याबद्दल चार स्वतंत्र गुन्हे पोलिसांनी दाखल केले. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी फिर्याद दिली असून, त्यात म्हटले आहे की गुरुवारी (दिनांक 14) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक भान्सी, पोलीस हवालदार दत्तात्रय बाबुराव जपे, पोलीस नाईक वसीम पठाण, तरटे, कॉन्स्टेबल चेतन प्रभाकर मोहीते, हवालदार संदीप काशिनाथ घोडके (नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) तसेच पोलिस हवालदार सुधीर सुधाकर क्षीरसागर, हवालदार वाघमारे, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे (नेमणूक तोफखाना पोलिस ठाणे) यांच्यासह मिरवणुकीसोबत राज्य राखीव पोलिस दलाचे इतर अंमलदार असे बंदोबस्त करीत असताना साऊंड सिस्टीमच्या आवाजात आरपीआय आठवले गट, सिध्दार्थ चौक, सिध्दार्थनगर यांची मिरवणूक ही खंडेलवाल स्वीट (एमजी रोड अहमदनगर) या ठिकाणी पोहोचली असताना अचानक मुस्लीम समुदायाच्या अंदाजे 60 ते 70 लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून मिरवणुकीच्या समोर येऊन नारे तकबीर अल्ला हु अकबर, या हुसेन या हुसेन अशा घोषणा देऊन, हिंदु-मुस्लीम धर्मामध्ये तेढ निर्माण करुन, दोन गटामध्ये शत्रुत्व वाद व एकोपा टिकण्यास बाधा निर्माण करुन, दंगा करुन आम्ही सरकारी काम करत असताना या सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करुन आमच्या दिशेने दगडफेक करुन व दगडफेक केल्याने मिरणुकीमधील लोकांचा जीव जाईल याची कल्पना असताना सुध्दा दगडफेक करुन पोलिसांच्या व नागरिकांच्या कमी-अधिक दुखापतीस कारणीभूत झालेले आहेत, असे या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकाराने मिरवणुकीत गोंधळ उडाला व नागरिकांची धावाधाव पळापळ सुरू झाली. त्यावेळी बंदोबस्तात असलेले पोलीस हवालदार सुधीर क्षीरसागर तसेच पोलिस हवालदार वाघमारे व मिरवणुकीसोबत असणारे अंमलदार व राज्य राखीव पोलिस दलाचे अंमलदार जमावाच्या दिशेने जात असता जमावातील लोकांनी पोलिसांवर सुध्दा दगडफेक केली. त्यामध्ये काही पोलिसांना मुक्कामार लागून किरकोळ दुखापत झाली आहे. त्यानंतर जमावातील लोकांना पोलिसांनी पाठलाग करून पकडून त्यांना लोकसेवा हॉटेलजवळ घेवून आले. शबाब शहानवाज शेख (वय 34, रा. बाबा बंगाली, अहमदनगर), फरहान फैरोज खान (वय 19, रा. हिना पार्क, मुकुंदनगर, अहमदनगर), मुजाहीद हुसेन शेख (वय 21, रा. सर्जेपुरा कौलारु समाज मंदिराजवळ, अहमदनगर), इरफान शकील शेख (वय 29, रा. मीरा मेडीकल शेजारी, तेलीखुंट, अहमदनगर), सोयब नादीर शेख (वय 33, रा. फकीर गल्ली, सर्जेपुरा, अहमदनगर), आरिफ आसिफ सय्यद (रा.21, रा. बडी मरीयम मस्जीद, मुकुंदनगर, अहमदनगर), शाकीब अन्सार सय्यद (वय 21, रा. आलमगीर मैदान, मुकुंदनगर, अहमदनगर), दानिश शकील सय्यद (वय 22, रा. दरबार चौक, मुकुंदनगर), तहा अनवर खान (वय 21, रा. पाथलिंब गल्ली, लोकसेवा हॉटेलमार्ग, अहमदनगर), मोहसीन युसुफ शेख (वय 19 वर्षे, रा बड़ी मस्जीद, मुकुंदनगर, अहमदनगर), आसिफ रियाज शेख (वय 19, रा. नॅशनल कॉलनी मुकुंदनगर, अहमदनगर), अदनान हुसेन शेख (वय 18, रा.घासगल्ली, कोठला, अहमदनगर), समी जावेद पठाण (वय 19, रा. आयशा मस्जीद समोर, मुकुंदनगर) अशी त्यांची नावे आहेत. तसेच इतर अंदाजे 50 ते 60 जण या ठिकाणावरुन पळून गेले. त्यावेळी त्या ठिकाणी मिरवणुकीतील लोकांमध्ये व मुस्लीम समुदायातील लोकांमध्ये दंगल होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या सर्वांना पोलिस स्टेशनमध्ये आणले. झालेल्या दगडफेकीमध्ये पोलिस नाईक अविनाश बबन वाकचौरे, पोलिस हवालदार सुधीर सुधाकर क्षीरसागर, पोलिस कॉन्स्टेबल चेतन प्रभाकर मोहिते, पोलिस हवालदार संदीप काशिनाथ घोडके तसेच पोलिस हवालदार प्रदीप भगवान सानप (नेमणूक एस.आर.पी.एफ.बल, गट क्रमांक 3 जालना) यांनासुध्दा दगडफेकीमध्ये मुक्का मार व कमी-अधिक दुखापत झालेली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात 60 ते 70 जणांंविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई कोतवाली पोलिस करीत आहेत.

परस्पर विरोधी घोषणा
कोतवाली पोलिस ठाण्याच्या जवळ असलेल्या आशा टॉकीज चौकात परस्परविरोधी घोषणांनी वातावरणात तणाव निर्माण झाला होता. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद तरुण मंडळ मंगलगेट यांच्या मार्फतीने सुनील मुरलीधर क्षेत्रे, राकेश रवींद्र वाघमारे, मृणाल विलास भिंगारदिवे,आकाश सुधीर सरोदे, सुबोध प्रवीण ढोणे यांनी तसेच प्रशांत पाटोळे यांनी मिरवणुकीसाठी परवानगी काढली होती तसेच त्यांना त्यासोबत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे मिरवणुकीच्या वेळेस कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य न करण्याबाबत नोटीस देण्यात घेतलेली होती. असे असताना मिरवणुकीदरम्यान रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास मिलींद तरुण मंडळ यांची मिरवणूकतख्ती दरवाजा मस्जीद जवळ आलेली असताना अचानक मंडळातील सुनील मुरलीधर क्षेत्रे, राकेश रवींद्र वाघमारे, मृणाल विलास भिंगारदिवे, आकाश सुधीर सरोदे, सुबोध प्रवीण ढोणे, प्रशांत पाटोळे, सचिन घनश्याम बुंदेले (रा. हमालवाडा, कलेक्टर ऑफीस जवळ अहमदनगर), जयेश लक्ष्मण माघारे (रा. दसरे नगर, सिटीलॉन मागे, सावेडी, अ.नगर) व इतर 20 ते 25 कार्यकर्ते हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणा देण्याचे सोडून त्या ठिकाणी जमलेल्या मुस्लीम समाजाच्या लोकांना पाहून दोन समाजामध्ये अथवा धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढून एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होईल तसेच दंगा निर्माण होईल या उद्देशाने जय श्रीराम.. जय श्रीराम अशा मोठमोठयाने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यास प्रत्युत्तर म्हणून तख्ती दरवाजा मस्जीद जवळ जमलेले कासीम शेख, मतीन शेख पहीलवान, शहा बुर्‍हाण ऊर्फ शानु, अब्दुल कादर, शहानवाज आस्मा क्रॉकरीवाला व इतर 20 ते 25 मुस्लीम समाजाच्या लोकांनी अल्ला हु अकबर.. इस्लाम जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली आहे. त्यावेळी त्या मंडळासोबत ड्युटीवर असणारे पोलिस नाईक अमोल आव्हाड, पोलिस कॉन्स्टेबल धाकतोडे, पोलिस नाईक भिमा कांबळे,तसेच तख्ती दरवाजा मस्जीद पॉईंटवर असणार्‍या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक उंबरहंडे (नेमणूक भरोसा सेल), पोलीस हवालदार अनारसे (नेमणूक नियंत्रण कक्ष) व इतर महिला अंमलदार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासोबत असणारे अंमलदार यांनी या लोकांना घोषणा न देण्याबाबत तसेच तुम्ही अशा घोषणा दिल्याने कायदा व सुव्यस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होऊन दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होत आहे असे समजावून सांगितले तसेच त्यांना बळाचा वापर करुन व आवश्यक सौम्य लाठीमार करुन तेथून काढून दिले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश दगडू शेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक इंगळे करीत आहे.

डीजे दणदणाट, गुन्हा दाखल
मिरवणुकीतील डीजे चालकासह मंडळाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेडकर जयंती मिरवणूक संदर्भात पोलीस प्रशासनाने मंडळांना ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनी प्रदूषण (नियम व निर्बंध) 2000 मधील तरतुदी व ध्वनी पातळीच्या मर्यादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश याची माहिती दिली होती तसेच त्या अनुषंगाने कोतवाली पोलिसांनी सीआरपीसी 149 अन्वये नोटीसा तयार करुन या नोटिसांची बजावणी गोपनीय पथकातील कर्मचार्‍यांन्वये केली. दि.14 रोजी डीजेचे मालक गणेश रामदास गिरमे (रा. मु. पो. कोडोली, ता. जि. सातारा), दीपकभाऊ निकाळजे (सामाजिक विकास संघ, माळीवाडा, अ.नगर) यांना डेसिबलवर निर्बंध असल्याने व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसीबलचे प्रमाण दर्शविणारी नोटीस अदा केल्याबाबत अवगत करण्यात आले. आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान मिरवणूक मार्गावर असताना आशा टॉकीज चौक येथे क्षमतेपेक्षा जास्त ध्वनीयंत्राचा वापर करून ध्वनीप्रदूषण केले. पोलिस पथक यांनी डीजेचे ध्वनीप्रदींषण मापक यंत्राच्या सहाय्याने डेसिबल घेतले असता त्याची परिमाणमता 107.5 डेसीबल एवढी दिसली. मंडळांचे अध्यक्ष व डीजे चालक-मालक मोठ्या क्षमतेच्या ध्वनीद्वारे ध्वनीप्रदूषण करून कायद्याचा भंग करीत होते व घटनास्थळी होत असलेल्या ध्वनी प्रदुषणामुळे रस्त्याने जा-ये करणार्‍या नागरिकांना व घटनास्थळाच्या आसपास राहात असलेल्या लोकांना त्याचा त्रास जाणवत होता. त्यावरून मंडळाचे पदाधिकारी व डॉल्बी स्पिकरचे मालक यांना डीजे चा आवाज कमी करण्याबाबत वेळोवेळी सांगत असताना त्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहित विश्‍वास आव्हाड, दीपकभाऊ निकाळजे, गणेश रामदास गिरमे (रा. मु. पो. कोडोली, ता. जि. सातारा) यांच्या विरुध्द गुन्ह्याची नोंद केली.

सिद्धार्थनगरच्या मंडळावर गुन्हा
मिरवणुकीदरम्यान बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळाचा डीजे पंचपीर चावडी येथे कर्कश आवाजात वाजत असल्याने बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिध्दार्थ नगरचे अध्यक्ष शांतवन पोपट साळवे यांना शासनाचे मार्गदर्शक सूचनांची नोटीस व दि.14 रोजी डीजेचे मालक ओकार संजय गाडेकर (रा. पिंपळी धुमाळ, शिक्रापूर, पुणे) यांना डेसिबलवर निर्बंध असल्याने व सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या डेसीबलचे प्रमाण दर्शविणारी नोटीस अदा केल्याबाबत अवगत करण्यात आले. दिनांक 14 रोजी पोलिस निरीक्षक शाखेच्या स्टाफने ड्युटीवर असतांना उत्सव समिती सिध्दार्थ नगर मंडळाचे अध्यक्ष यांनी मिरवणुकीदरम्यान पांचपीर चावडी येथे क्षमतेपेक्षा ध्वनीयंत्राचा ध्वनी वाढविल्याने या ठिकाणी जाऊन ध्वनीप्रदूषण मापक यंत्राचे सहाय्याने डेसिबल घेतले असता त्याची परिमाणमता 124.9 डेसीबल एवढी दिसली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शांतवन साळवे, ओकार संजय गाडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगलगेट समितीवर गुन्हा
मंगलगेट येथील आंबेडकर जयंती उत्सव समिती मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ.आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान मंडळाचे पदाधिकारी यांनी डीजे लावून मिरवणूक काढून पोलिसांनी डीजेचा आवाज कमी करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे उल्लंघन केले. ही घटना आशा टॉकीज चौकात घडली. या प्रकरणी पोलिस नाइक तन्वीर सलीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृणाल विलास भिंगारदिवे ऊर्फ मुन्ना (रा. कोंडयामामा चौक. अ.नगर), फारूख अजिज पठाण (रा पिंपळगांव माळवी, ता.जि. अ.नगर) व मंगलगेट येथील उत्सव समिती मंडळावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत

माळीवाडा मंडळावर गुन्हा दाखल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवादरम्यान माळीवाडा मंडळाचे पदाधिकारी यांनी डीजे लावून मिरवणूक काढून सूचनांचे उल्लंघन केल्याचा प्रकार कोतवाली पोलिस ठाण्याजवळ आशा टॉकीज चौक येथे घडला. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलीस नाईक योगेश खामकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुजित सुभाष घंगाळे (डॉ आंबेडकरनगर मित्रमंडळ, माळीवाडा, अ.नगर), डीजेचे मालक विवेक सुभाष रूपनवर (रा. केडगांव चौफुला, ता. दौड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली असून पुढील कारवाई पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.

COMMENTS