हिंदमाता परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदमाता परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याचा मार्ग मोकळा

पावसाळा तोंडावर आला असताना हिंदमाता परिसरात टाटा मिल्सच्या जमिनीखालून पर्जन्य जलवाहिनी घालण्याविषयीच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सरकारला किंमत मोजावी लागेल
खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात ;
मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

मुंबई/प्रतिनिधीः पावसाळा तोंडावर आला असताना हिंदमाता परिसरात टाटा मिल्सच्या जमिनीखालून पर्जन्य जलवाहिनी घालण्याविषयीच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ’आमच्या जमिनीखालील या प्रकल्पाच्या कामाला परवानगी देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला असून यासंदर्भातील प्रारूप सामंजस्य करारनामा महापालिकेकडे पाठवला आहे. तसेच भरपाईची आवश्यक रक्कमही कळवली आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात हिंदमात परिसरात पाणी साचून नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यामुळे महापालिकेकडून तीन ठिकाणी भूमिगत टाक्या बांधण्यात येत असून, या परिसरात साचणारे पाणी या टाक्यांपर्यंत वाहून नेण्यासाठी 650 मीटर लांब व बाराशे मिलीमीटरची व्यासाची भूमिगत पर्जन्य जलवाहिनी घालण्यात येत आहे. ही जलवाहिनी एनटीसीएलच्या अखत्यारितील टाटा मिल्सच्या जमिनीखालूनही प्रस्तावित असल्याने महापालिकेने त्यासाठी परवानगी मागितली होती; मात्र परवानगी वेळेत मिळत नसल्याचे पाहून टाटा मिल्सला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 30 अन्वये नोटीस बजावण्यात आली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही टाटा मिल्सच्या आवारात घुसखोरी करत कंत्राटदाराची यंत्रसामुग्री दाखल केली. त्यामुळे टाटा मिल्सच्या महाव्यवस्थापकांनी अ‍ॅड. भूषण जोशी यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. एनटीसीएलला आवश्यक भरपाई देण्याची तयारी महापालिकेने दर्शवल्यानंतर पावसाळा तोंडावर आल्याचे पाहून न्यायालयाने केंद्राला 26 मेच्या आधी मंजुरीबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, न्या. आर. डी. धनुका व न्या. माधव जामदार या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा, केंद्राने प्रस्ताव मंजूर केला असल्याची माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी दिली. केंद्राने प्रस्ताव मंजूर केल्याने आता महापालिकेने पुढील कार्यवाही तातडीने करणे आवश्यक असून आमचे पूर्ण सहकार्य असेल, असे टाटा मिल्सतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी सांगितले.

COMMENTS