Homeताज्या बातम्यासंपादकीय

बंडखोरी आणि पक्षनिष्ठा !

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता मतदानाचा दिवस

दादागिरीला झुकते माप
धर्म काय कामाचा ?
यंदा चांगल्या पावसाचे वर्तमान

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता मतदानाचा दिवस 20 नोव्हेंबरला उजाणार आहे. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक म्हणावी तशी साधी आणि सोपी नाही. कारण या निवडणुकीत प्रत्येक पक्षासमोर नवे आव्हान उभे आहे. या निवडणुकीत बंडखोरी मोठ्या प्रमाणावर झाली होती. मात्र अपवाद वगळता बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान करत पक्षासोबत एकनिष्ठ राहण्याचे ठरवलेले दिसून येत आहे. वास्तविक पाहता सोमवार हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी कोल्हापुरात वेगळाच राडा बघायला मिळाला. त्याचबरोबर अनेक ठिकाणी एकाच मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार एक-मेकांसमोर उभे ठाकले आहेत, त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे देखील काही ठिकाणी उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे. खरंतर उमेदवारी मिळत नाही, ही जागा त्या पक्षाला सोडली आहे म्हणून त्या पक्षात जात पक्षांतर करणार्‍यांची संख्या कमी नव्हती. त्याशिवाय समोरच्या पक्षात निवडणुकीला उभा राहणारा चेहरा नसल्यास तो इतर पक्षातून आयात करण्याची संधी देखील यावेळी पक्षांनी सोडली नाही. त्यामुळे पक्षनिष्ठा, कार्यकर्त्यांशी बांधीलकी हे शब्द आता परवलीचे झाले आहेत. केवळ सत्ता आणि पद हवे हीच आता राजनिष्ठा होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्रातील राजकारणाने वेगळे वळण घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य म्हणून देशभर ओळखले जाते. मात्र या राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. कुणाचाही कुणालाही पायपोस नाही. बाप-मुलीविरोधात लढतोय, तर काका पुतण्याविरोधात लढतोय, असे महाराष्ट्रचे चित्र दिसून येत आहे. खरंतर भारतीय संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क आहे, मात्र त्याने नियमानुसार कागदपत्रांची आणि सूचक व्यक्तीची नावे देणे बंधनकारक आहे. त्यामुळे साहजिकच कुणी अपक्ष राहू शकतो तर कुणी बंडखोरी करू शकतो, तो त्याचा हक्क आहे. मात्र बंडखोरी ही कशासाठी आहे? यातून बर्‍याच बाबी अधोरेखित होतात. बंडखोरीला कार्यकर्त्यांची साथ आहे का? हा महत्वाचा विषय आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन प्रमुख गटात लढत होणार आहे. या लढतीत नेमके कोण विजयी होईल याचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल, तेव्हाच महायुती आणि महाविकास आघाडीचा निकाल लागेल. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणखी दोन पक्षांची भर पडली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाचे दोन पक्ष तर राष्ट्रवादी काँगे्रसचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट समोरासमोर उभे ठाकले आहे. त्यातच काँगे्रस महाविकास आघाडीमध्ये तर भाजप महायुतीसोबत असल्यामुळे दोन्हीकडील टक्कर ही मजबूत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक 31 जागा जिंकत मोठा विजय संपादन केला होता. तर दुसरीकडे महायुतीने विरोधात गेलेले वातावरण दूर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी महत्वाकांक्षी योजना आणत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रूपये दिले. वास्तविक पाहता महाविकास आघाडी आणि महायुतीचे भवितव्य लाडकी बहीण ठरवणार आहे, यात कोणतीच शंका नाही. ती कुणाच्या पारड्यात मत देते, यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार आहे. वास्तविक पाहता अनेकांनी बंडखोरी केली असली तरी बंडखोरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नसला तरी, त्यांच्यामागे पक्षाचे छुपे आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांचे मोठे पीक येवू शकते. शिवाय अपक्ष उमेदवारांचे पीक मोठ्या प्रमाणावर आल्यास पुन्हा एका फोडा-फोडीचे राजकारण पाहायला मिळू शकते. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. जर त्यातच महायुती काही उमेदवार निवडून आणण्यास यशस्वी होवू शकते कारण त्यांना महायुतीचे पक्ष मदत करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तिसरी आघाडी काही उमेदवार निवडून आणू शकतात, त्यामुळे पुन्हा फोडा-फोडीच्या राजकारणाला ऊत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS