इस्लामपूरात राजकीय उलथापालथ होणार का? इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटी
इस्लामपूरात राजकीय उलथापालथ होणार का?
इस्लामपूर / हिंम्मत कुंभार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे अष्टपदी आमदार होणार की त्यांचा विजयी रथ भाजपचे जिल्हाध्यक्ष व इस्लामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील रोखणार? याकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून जयंत पाटलांना मतदार संघातच रोखण्याचा प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत आ. जयंत पाटील विरोधकांची एकजूट हे त्यांच्यासाठी आजपर्यंत दिवास्वप्नच ठरले आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात आ. जयंत पाटील यांच्या विरोधात एकास-एक लढत द्यायची या हेतूने सर्वपक्षीय गट एकत्र आले आहेत . महायुतीतर्फे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातून शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे अजित पवार यांचे घड्याळ निशिकांत भोसले-पाटील यांच्या हातात जाणार असल्याने आ. जयंत पाटील यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. अजित दादांचे घड्याळ निशिकांत दादांच्या हातात गेल्याने इस्लामपूरमध्ये राजकिय उलथा-पालथ होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांच्या विरोधात महायुतीच्या माध्यमातून भाजपचे निशिकांत पाटील, राहुल महाडीक, शिवसेना शिंदे गटाचे गौरव नायकवडी, आनंदराव पवार यांच्याकडून उमेदवारीची मागणी होत आहे. परंतू महायुती सर्व्हे करून मेरिटनुसार उमेदवारी देणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आठव्यांदा विधानसभा लढवत आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या मताधिक्याचा आकडा वाढतच चालला आहे. वाळवा तालुक्यात आ. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीचा प्रयोग गेल्या अनेक निवडणुकांपासून सुरु आहे. परंतू आ. जयंत पाटील यांची राजकीय खेळी सर्वश्रुत आहे. त्यामुळे विरोधकांना अपयश येत आहे. आ. जयंत पाटील यांच्या एकूण विरोधी मतांची बेरीज पाहिल्यावर महायुतीतील नेत्यांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांची एकी निवडणुकी अगोदर अभेद्य असते. मात्र, निवडणुकीचे वातावरण तापायला लागल्यावर या एकजूटीला अचानक सुरुंग लागतो.
केंद्रात पाच वर्षे तर राज्यात अडीच वर्ष भाजप-सेनेचे सरकार असल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे. विरोधकांच्यातील कमजोरीचा फायदा आ. जयंत पाटील यांना नेहमीच होत आला आहे. मात्र, निशिकांत पाटील यांच्या रूपाने विरोधकांना नवा चेहरा मिळाला आहे. गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना दोन नंबरची मते मिळाली होती. या पराभवानंतर निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तयारी केली आहे. गावनिहाय बुथ समित्या स्थापन करुन गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले आहे. मतदार संघातील पाणंद रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणत कामालाही सुरुवात केली आहे. यामुळे पाणंद रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित पडलेला प्रश्न मार्गी लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे मतदार संघात पक्ष संघटन घट्ट आहे. राजारामबापू शिक्षण, उद्योग, बँक, दूध संघाच्या माध्यमातून गावागावातील कार्यकर्ते जोडले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने विरोधकांनी एकजूट होऊन महायुती उमेदवाराच्या विजयासाठी एकसंघ होऊन प्रचार करणे गरजेचे आहे.
तुतारी चिन्ह रुजविण्याचे आव्हान
राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांच्याकडेच राहिले. खा. शरदचंद्र पवार यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह पक्षासाठी घेतले आहे. विधानसभेसाठी इस्लामपूर मतदारसंघ कोणत्याही पक्षाला गेला तरी निशिकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. तसा पक्षश्रेष्ठीकडून त्यांना शब्द दिला होता. महायुतीच्या जागा वाटपात इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी (अजित पवार) च्या वाट्याला गेला आहे. इस्लामपूर मतदार संघात साहेबांचे घड्याळ हे चिन्ह मनामनात रुजलेले आहे. त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह रुजविण्याचे आ. जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
COMMENTS