Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निकृष्ट दर्जाच्या गणवेशाची चौकशी करावी

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची गटविकास अधिकार्‍यांकडे मागणी

देवळाली प्रवरा ः शासनाच्या मोफत गणवेश योजनेतून विद्यार्थ्यांना दिलेल्या पहिल्या गणवेशाचे कापड व शिलाई दर्जा निकृष्ट आहे. त्याची चौकशी करून दोषींव

अक्षय कुमारपाठोपाठ 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण | 12 च्या १२ बातम्या | Lok News24
Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह
शिवाजीराव लावरे यांनी स्वीकारला प्राचार्यपदाचा कार्यभार

देवळाली प्रवरा ः शासनाच्या मोफत गणवेश योजनेतून विद्यार्थ्यांना दिलेल्या पहिल्या गणवेशाचे कापड व शिलाई दर्जा निकृष्ट आहे. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांना देऊन तक्रारींचा पाढा वाचला.
      राहुरी येथे पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनीत धसाळ (तांदुळवाडी), गोविंद फुणगे (वळण), गणेश वाघ (वाघाचा आखाडा), सोमनाथ वाघ (मानोरी) आदींसह पालकांनी निवेदन दिले. यावेळी प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी गोरक्षनाथ खळेकर उपस्थित होते. शासनातर्फे एक राज्य एक गणवेश उपक्रम स्तुत्य आहे.  परंतु त्याची अंमलबजावणी चुकीची झाली आहे. जून महिन्यात शाळा उघडल्याच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश मिळणे गरजेचे होते.  निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सर्व शाळांना पहिला गणवेश मिळाला नाही. ज्या शाळांना पहिला गणवेश मिळाला, तो दर्जाहीन आहे. कापड खरेदी व शिलाई निकृष्ट झाल्याने विद्यार्थ्यांनी अंगात गणवेश घालताच कापड फाटत आहे, शिलाई उसवत आहे.  आडमाप शिवलेले, लांब अंतराची टीप असलेले, फाटलेले गणवेश मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मिळाले. सहावी ते आठवीच्या मुलींना गुडघ्याच्या वर स्कर्ट असलेला गणवेश पालकांना मान्य नाही. त्यांना सलवार-कुर्ता व विद्यार्थ्यांना हाफ पॅन्ट ऐवजी फुल पॅन्ट मिळावी. निकृष्ट शिलाईची चौकशी व्हावी.  दुसरा गणवेश तातडीने मिळावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली.

गणवेशाच्या निकृष्ट कापड व शिलाईची चौकशी केली जाईल.  गटशिक्षणाधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन गणवेशाच्या तक्रारींची शहानिशा केली जाईल. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवून दोषींवर कारवाईची शिफारस केली जाईल.
वैभव शिंदे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, राहुरी.

निकृष्ट गणवेशाच्या कापड व शिलाईची गुणवत्ता तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.  पाचवी ते आठवीच्या मुलांना फुल पॅन्ट व मुलींना सलवार-कुर्ता मिळावा. दुसरा गणवेशही तात्काळ मिळावा. अन्यथा येत्या आठ दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
 गोविंद फुणगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, वळण.

माझी मुलगी तिसरीत शिकते. तिला फाटका गणवेश मिळाला. फाटलेल्या ठिकाणी घरीच शिलाई करुन मुलीला गणवेश दिला. कापड व शिलाई निकृष्ट असल्याने चार महिने गणवेश टिकणार नाहीत. विनीत धसाळ, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, तांदुळवाडी. 

COMMENTS