भारतातील शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. ठराविक काळात पाऊस पडला नाही, तर संपूर्ण अर्थचक्रच कोलमडतं.
भारतातील शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. ठराविक काळात पाऊस पडला नाही, तर संपूर्ण अर्थचक्रच कोलमडतं. पाऊस पडणार का, किती पडणार, वेळेवर पडणार का, याची चिंता शेतकर्यांना लागलेली असते. गेल्या काही वर्षांपासून पावसाचा अचूक अंदाज व्यक्त केला जात असतो. त्याकडं शेतकर्यांच्या नजरा लागलेल्या असतात. या वर्षी ’स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनं व्यक्त केलेला पावसाचा अंदाज उभारी देणारा आहे.
जगात अनेक देशांत वर्षभर पाऊस पडत असला, तरी भारतात मात्र तसं नाही. इथं चारच महिने पाऊस पडतो. एरव्ही पडणार्या पावसाची संभावना अवकाळी पावसात केली जात असते. शाश्वत सिंचनाची सुविधा कमी असलेल्या भारतासारख्या देशात पावसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतातील काही भाग वगळला, तर बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाच्या अंदाजाकडं केवळ शेतकर्यांचचं लक्ष नसतं. उद्योग जगत, केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि रिझर्व्ह बँकेसारख्या यंत्रणाचं लक्ष लागलेलं असते. पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला, की या यंत्रणांच्या पोटात भीतीचे ढग येतात. त्याचं कारण महागाई वाढण्याचा धोका असतो. गेल्या काही वर्षांत पावसाच्या अंदाजाबाबत अचूकता आली असली, तरी कमी काळात जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तसा त्याचा शेतीला फारसा फायदा होत नसला, तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई होत नाही, ही मोठी उपलब्धी आहे. आवश्यकता असेल, तेव्हा आणि आवश्यकतेइतका पाऊस पडला, तरच तो शेतकर्यांसाठी उपयुक्त असतो. भारतीय हवामान विभाग, नोमुरा, स्कायमेटसारख्या संस्था पावसाचा अंदाज व्यक्त करीत असतात. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत शेतीचा वाटा 14 टक्के असला, तरी एकूण लोकसंख्येच्या 59 टक्के लोक शेतीवर अवलंबून असल्यानं शेतीचा रोजगाराच्या दृष्टीनं महत्त्वाचा वाटा आहेच. शिवाय गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेची इतर अंगं पांगळी झाली असताना शेतीनंच अर्थव्यवस्थेला तारलं आहे, हे विसरून चालणार नाही. सेवा क्षेत्र, उत्पादन क्षेत्र आदी बहुतांश क्षेत्र नकारात्मक राहिली, त्या वेळी शेती हे एकमेव क्षेत्र असं आहे, की त्यानं सकारात्मक वाढ नोंदविली.
आताही कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या काळात शहरातील असंघिटत क्षेत्राची पावलं गावाकडं वळली आहेत. त्यांना सामावून घ्यायचं असेल, तर चांगला पाऊस पडायला हवा. निसर्गालाच या संकटातून मार्ग काढण्याचं सुचलं असावं. त्यामुळं तर या वर्षी ही चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त झाला असावा. स्कायमेटच्या मान्सूनच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे, की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, पावसाळ्याचा सुरुवातीचा महिना जून आणि शेवटचा महिना सप्टेंबरमध्ये देशभरात व्यापक पावसाची चिन्हं आहेत. 96 टक्के ते 104 टक्के दरम्यानचा पाऊस सरासरी किंवा सामान्य पावसाळा म्हणून परिभाषित केला जातो. नैऋत्य मॉन्सून साधारणत: एक जूनच्या आसपास केरळमार्गे भारतात प्रवेश करतो. पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतर म्हणजे सप्टेंबरअखेर मान्सून राजस्थानमार्गे परत येतो. प्रशांत महासागरात गेल्या वर्षभरापासून ’ला निना’ची स्थिती कायम आहे आणि आतापर्यंत मिळालेले संकेत असा इशारा करतात, की संपूर्ण पावसाळ्यात ही स्थिती राहू शकते. पावसाळ्याच्या मध्यापर्यंत प्रशांत महासागराच्या मध्यवर्ती भागात पुन्हा समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होण्यास सुरुवात होईल. तथापि, समुद्राच्या पृष्ठभागावर थंड होण्याची ही प्रक्रिया अत्यंत संथ असेल. मॉन्सून खराब करणारी ’अल-निनो’ उभरण्याची शक्यता या वर्षीच्या पावसाळ्यात नाही.
मॉन्सूनवर होणारा आणखी एक महत्त्वाचा महासागरीय बदल म्हणजे सध्या हिंदी महासागरापासून दूर असलेलं मेडेन ज्युलियन ओशिलेशन. संपूर्ण मॉन्सून हंगामात तो मुश्किलीनं हिंद महासागरातून साधारणपणे 3-4 वेळा जातो. पावसाळ्यावर त्याचा काय परिणाम होईल याबद्दल काही सांगणं घाईचं ठरेल. स्कायमेटच्या मते, जूनमध्ये 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर सामान्य पावसाची शक्यता 70 टक्के आहे. सामान्यापेक्षा अधिक पावसाची 20 टक्के शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे. जुलैमध्ये 97 टक्के पाऊस होऊ शकतो. सामान्य पावसाची 75 टक्के शक्यता आहे. सामान्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता 10 टक्के आहे. सामान्यापेक्षा कमी पावसाची शक्यता 15 टक्के आहे. ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची 80 टक्के शक्यता आहे. सामान्यपेक्षा जास्त 10 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. सामान्य पावसापेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये 116 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य पावसाची 30 टक्के शक्यता आहे. सामान्यापेक्षा जास्त पावसाची 60 टक्के आणि सामान्यपेक्षा कमी पावसाची 10 टक्के शक्यता आहे. ’अल-निनो’मुळं पॅसिफिक महासागरामधील समुद्राचा पृष्ठभाग अधिक गरम होता, ज्यामुळं वार्याचा मार्ग आणि वेग यामध्ये बदल होतो, ज्यामुळं हवामान चक्रावर वाईट परिणाम होतो. हवामानातील बदलामुळं काही ठिकाणी दुष्काळ पडतो, तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. त्याचा परिणाम जगभर दिसून येतो.’अल निनो’मुळं भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडतो, तर अमेरिकेत मुसळधार पाऊस पडतो. ज्या वर्षी अल निनोची सक्रियता वाढते, त्यावर्षी निश्चितच त्याचा परिणाम नैऋत्य मॉन्सूनवर होतो. भारतात नैऋत्य मॉन्सूनला पावसाळी हंगाम असं म्हणतात. कारण जून ते सप्टेंबर या कालावधीत 70 टक्के पाऊस या चार महिन्यांत असतो. भारतात ’अल निनो’मुळं दुष्काळाचा धोका सर्वाधिक आहे. एका अहवालानुसार, भारतातील सुमारे वीस कोटी शेतकरी धान, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारखी अनेक पिकं घेण्यासाठी मॉन्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात. यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे देशातील जवळपास 50 टक्के शेतीयोग्य जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. देशातील 65 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणार्या शेतीला इतकं महत्त्व का दिलं जात असतं, हे यावरून लक्षात यायला हरकत नाही. स्कायमेटच्या अंदाजानंतर आता केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आदींनी आता सुटकेचा निश्वास टाकला असेल.
COMMENTS