नवी दिल्ली/इंदूर : राजधानी दिल्लीमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 9 जणांचा बुधवारी मृत्यू झाला तर, दुसरी घटना मध्यप्रदेशातील इंदूर शहरात घडली. इ

नवी दिल्ली/इंदूर : राजधानी दिल्लीमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 9 जणांचा बुधवारी मृत्यू झाला तर, दुसरी घटना मध्यप्रदेशातील इंदूर शहरात घडली. इंदूरमधील बृजेश्वरी अॅनेक्स या निवासी परिसरात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, राजधानी दिल्लीत दक्षिण-पश्चिम भागातील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीत लागलेल्या भीषण आगीने 9 जणांचा बळी घेतला. यात 3 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. 2 लोकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उडी मारली. त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग लागल्याच्या वेळी संबंधित इमारतीत एका कुटुंबातील नऊ सदस्य उपस्थित होते. अचानक लागलेल्या आगीमुळे आणि त्यानंतर वेगाने पसरलेल्या धुरामुळे सर्वजण आत अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर अत्यंत अरुंद आणि दाट लोकवस्तीचा असल्याने बचावकार्य करताना अडचणी निर्माण झाल्या. काही रुग्णवाहिका घटनास्थळापासून दूर उभ्या कराव्या लागल्या. तरीही बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून आगीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांनंतरही पाच जणांचा मृत्यू झाला. तर दुसरी घटना इंदूरमध्ये संबंधित घराबाहेर उभ्या असलेल्या विद्युत वाहनाच्या चार्जिंग यंत्रणेत अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेली आग क्षणातच वाहनातून घरात पसरली. घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर साठवलेले होते. त्यापैकी काही सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीची तीव्रता प्रचंड वाढली आणि काही क्षणांतच संपूर्ण घर ज्वाळांनी वेढले गेले. याशिवाय, घरात ज्वलनशील रसायनांचा साठा असल्याचीही माहिती समोर आली आहे. या रसायनांमुळे आगीचा वेग आणि तीव्रता अधिक वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही दुर्घटना अधिक भीषण ठरली. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सकाळच्या सुमारास अचानक आरडाओरडा ऐकू येताच ते बाहेर धावले. तेव्हा संबंधित घरातून धूर आणि ज्वाळा उसळताना दिसत होत्या. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवले. काहींनी स्वतःहून पाण्याच्या बादल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीचा वेग इतका प्रचंड होता की प्रयत्न अपुरे ठरले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले सर्वजण आगीत अडकून जिवंत जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. निवासी भागात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर आणि ज्वलनशील पदार्थ साठवणे, तसेच विद्युत वाहन चार्जिंगसाठी योग्य सुरक्षा उपाय न करणे, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबांसाठी आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी दोन्ही घटनांना दुःखद म्हटले असून, या कठीण काळात शोकाकुल कुटुंबांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले की, ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तसेच, पंतप्रधान राष्ट्रीय सुरक्षा दलाकडून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर करण्यात आली आहे.

COMMENTS