Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाडयात पाच महिन्यात 475 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

राज्यात सत्तांतर होऊन आत्महत्या रोखण्यात अपयश

औरंगाबाद प्रतिनिधी - मराठवाडयाच्या नशिबी कायम दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. मग तो दुष्काळ ओला असो की, कोरडा. शेतकर्‍यांच्या आत्महत्या नेहमीच्याच. त्

छत्रपती संभाजीनगरात विनापरवानगी कँडल मार्च
खैरेंनी आता मनपाचीही तयारी करावी : शिरसाट
रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र

औरंगाबाद प्रतिनिधी – मराठवाडयाच्या नशिबी कायम दुष्काळ पाचवीलाच पुजलेला. मग तो दुष्काळ ओला असो की, कोरडा. शेतकर्‍यांच्या आत्महत्या नेहमीच्याच. त्या रोखण्यात सत्ताधार्‍यांना आलेले अपयश देखील नेहमीचेच. मराठवाडयातील विशेषतः औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्री पद असतांना देखील ते शेतकर्‍यांना दिलासा देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मराठवाडयात जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यात तब्बल 475 शेतकर्‍यांनी आत्महत्या करून, मृत्यूला कवटाळल्याचे समोर आले आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तरी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील, असे वाटत होते. परंतु तरीही शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत. महाराष्ट्रात पाच महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु सरकार बदललं असले तरी शेतकर्‍यांच्या आयुष्यातील समस्या मात्र कायम आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा आणि वाढत्या महागाईमुळं गेल्या पाच महिन्यात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत तब्बल 475 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  जुलै महिन्यात ठाकरे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले होते. त्याचवेळी शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडलेला होता. जुलै महिन्यात 83, ऑगस्टमध्ये 123, सप्टेंबरमध्ये 96, ऑक्टोबरमध्ये 94 आणि नोव्हेंबर महिन्यात 79 शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे जीवनयात्रा संपवली आहे. यातील सर्वाधिक आत्महत्या या बीड (249) जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यात 161, जालन्यात 115, नांदेडमध्ये 140 परभणीत 67, लातूरमध्ये 59 आणि उस्मानाबादेत 107 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे सरकार शेतकर्‍यांचे असल्याचे वक्तव्य केले होते. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली होती. आर्थिक मदतीचीही घोषणा सरकारने केलेली असतानाही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा वाढता आकडा हा चिंताजनक आहे.

गेल्या वर्षभरात 939 शेतकर्‍यांच्या आत्महत्या – गेल्या वर्षभराच्या काळात मराठवाड्यात 939 शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे जीवन संपवले होते. परंतु यंदा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे. याशिवाय राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठवाड्यात पावसाने कहर केला, परिणामी उभी पिके  वाहून गेली. त्यानंतर शेतकर्‍यांना आवश्यक ती मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्याचबरोबर पिकविम्याचे पैसे आणि अतिवृष्टीग्रस्त भागांतील शेतकर्‍यांना आर्थिक मदतही शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली होती. परंतु तरीदेखील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा आकडा थांबलेला नाही.

COMMENTS