Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १

पोल्ट्री धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवू
लैंगिक शोषण करणार्‍यांविरोधातील उपोषणास दाद मिळेना…
विकासकामांसाठी कटिबद्ध ः नागवडे

अहिल्यानगर : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, अकोले विधानसभा मतदारसंघात ९,  संगमनेर १३, शिर्डी ८, कोपरगाव १२, श्रीरामपूर १६, नेवासा १२, शेवगाव १५, राहुरी १३, पारनेर १२, अहमदनगर शहर १४, श्रीगोंदा १६, तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला मतदार आहेत. २०२ तृतीयपंथी मतदार असून सैनिक मतदारांची संख्या ९ हजार ५७५ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे ५४ हजार नवमतदारांची भर पडली असल्याची माहितीही श्री. सालीमठ यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९४ ठिकाणी ३ हजार ७६३ मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.  १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने शिर्डी मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गजराजनगर (बुऱ्हाणनगर) जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व इमारतीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

जिल्ह्यात १९ हजार ९६० दिव्यांग व ८५ वर्षावरील ५५ हजार ८०१ एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी २ हजार ६८८ मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान व्यवस्थेचा भाग म्हणून ३४३ क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी केली असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ हजार ५८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच  अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे मद्य, रोकड आदी मिळून २८ कोटी २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  निवडणुकीशी निगडीत ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती श्री. ओला यांनी यावेळी दिली. 

COMMENTS