नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीनसह इतर देशात कोरोनाच्या नव-नव्या व्हेरिअंटचा कहर सुरु असतांना, भारतात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण नगण्य
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः चीनसह इतर देशात कोरोनाच्या नव-नव्या व्हेरिअंटचा कहर सुरु असतांना, भारतात मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण नगण्य आहे. मात्र परेदशातून नागरिक भारतात परतत असून, त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केल्यानंतर त्ते कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. देशभरात कोरोना ओमिक्रॉनचे तब्बल 11 प्रकार आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. त्यानुसार गुरुवारी भारतातील कोविड संसर्गामध्ये किंचित वाढ झाली आहे. मागच्या 48 तासांत 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी देशात 175 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली होती. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान विविध विमानतळे, बंदरे, लँड पोर्टवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीमधून कोरोनाचे 11 व्हेरियंट आढळून आले आहेत. मागच्या 10 दिवसांत एकूण 19 हजार 227 नमुने तपासण्यात आले, त्यापैकी 124 प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बाधित 124 रुग्णांपैकी 40 पॉझिटिव्ह नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल मिळाले आहेत. या रुग्णांमध्ये एक्सबीबी-1, एक्सबीबी. बी-7.4.1अशा व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळलं आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपासणीदरम्यान आढळून आलेल्या ओमिक्रॉनच्या सर्व 11 व्हेरिएंटची प्रकरणे देशात यापूर्वीही नोंदवली गेली आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 79 हजार 319 लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,554 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी सकाळी 8 वाजता प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविड 19 मुळं भारतात आतापर्यंत 5 लाख 30 हजार 710 लोकांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन संसर्ग दर 0.10 टक्के आहे, तर साप्ताहिक संसर्गाचा दर 0.12 टक्के आहे. कोरोना संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी एकूण बाधितांच्या 0.01 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासांत 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के इतका आहे. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 41 लाख 46 हजार 55 लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे. आतापर्यंत नागरिकांना 200 कोटींच्या वर कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
COMMENTS