सेल्फी देई दुखाचा डोंगर

Homeसंपादकीय

सेल्फी देई दुखाचा डोंगर

कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याची सवय इतकी अंगी भिनली आहे, की त्यातून जीव जातात; परंतु त्याचे भान कुणालाच राहिलेले नाही.

नावात काय आहे ?
उमदे नेतृत्व आणि वैद्यकीय क्षेत्र ! 
वृध्द म्हणून संभावना करण्यापर्यंत घसरले ! 

कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याची सवय इतकी अंगी भिनली आहे, की त्यातून जीव जातात; परंतु त्याचे भान कुणालाच राहिलेले नाही. सेल्फी हा त्यातलाच प्रकार. आनंदोत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही; परंतु सेल्फी काढताना हा आनंदोत्सव त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरता कामा नये. इतरांसाठी तो क्षण कायमचा दुखाचा ठरता कामा नये, एवढे भान तरी बाळगले पाहिजे. 

 कोणतीही घटना असली तरी त्या घटनेचा एक साक्षीदार म्हणून तर कधी आठवणींच्या कोलाजमध्ये तो क्षण जपून ठेवण्यासाठी सेल्फीचा अट्टाहास हा प्रत्येकाचाच असतो. प्रत्येक प्रसंग सेल्फीद्वारे जतन करत असतो. तरूणाईची आवड व सध्याची क्रेझ लक्षात घेऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी सेल्फी पाँईट ही तयार केले आहेत; परंतु या सेल्फी पॉईंटची सुरक्षितता काय, हे पाहिले जात नाही.             कोणत्याही गोष्टीचा नाद लागला किंवा जास्त आहारी गेलो, तर ती गोष्ट आपला घात करते. सेल्फीचे ही तसेच आहे. सेल्फी काढताना आपण त्या मोबाईलमधील कॅमेर्‍याात स्वत:ला पाहण्यातच इतके रमलेलो असतो, की आजूबाजूच्या परिस्थितीचे भानच राहत नाही आणि हाच सेल्फी जीवघेणा ठरून शेवटचा ठरतो. एखाद्या उंच ठिकाणावरून काढलेला सेल्फी, कड्याच्या टोकाला उभ राहून काढलेला सेल्फी, गर्दीच्या ठिकाणचा सेल्फी, अपघाताच्या ठिकाणी मदतीचा हात देण्याऐवजी अपघाताची तीव्रता दर्शवणारा सेल्फी, फेसाळणार्‍या लाटा अंगावर झेलत काढलेला सेल्फीच कधीकधी अखेरचा ठरत असतो. रोजच सेल्फी काढायच्या नादात झालेले विचित्र अपघात कानावर पडत असतात. दिवसेंदिवस या अपघाताच्या संख्येत वाढ होते हा चिंतेचा विषय आहे. सेल्फीचा परिणाम मनावर होतो. खूप सारे सेल्फी काढणे ही नंतर मानसिकदृष्या दुर्बलतेकडे झुकण्याची सुरुवात होते हे शास्त्रीयदृष्या सिद्ध झाले आहे. तरुणांमध्ये सध्या वाढदिवस वेगळ्या आणि हटके पद्धतीत साजरी करण्याची वेगळी क्रेझ आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करुन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण बनवण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांचा हाच प्रयत्न कधीकधी अंगावर येऊ शकतो. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्यापैकी कुणाचा जीवही जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. वाढदिवस साजरी करण्यासाठी धरणावर गेलेल्या पाच मुली आणि एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारण आज सहा कुटुंबानी त्यांच्या घरातील एक सदस्य गमावला आहे.

नाशिकमध्ये सेल्फी काढणे काही तरुणींना महागात पडले आहे. सेल्फी काढण्याच्या नादात सहा जणांचा धरणात पडून मृत्यू झाला. सर्व मृतक तरुण हे शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होते. त्यांच्या ग्रुपमधील एका मुलीचा आज वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते वालदेवी धरणावर गेले होते. या परिसरात त्यांनी वाढदिवसाचा केक कापला, सेलिब्रेशन केले; मात्र सेल्फी काढत असताना काही मुली वालदेवी धरणाच्या कडेला उभ्या राहिल्या. या वेळी त्यांचा पाय सटकला आणि पाण्यात तोल गेला. त्यामुळे त्या धरणात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी बाकीच्यांनी प्रयत्न केला; मात्र त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एका मुलाचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही एकमेव घटना नाही. पैनगंगा नदीत होडीतून जाताना सेल्फी काढताना बोट कलंडून पाण्यात बुडाली आणि त्यात कितीतरी जणांचा बळी गेला. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या कडेला उभे राहून सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून दोन भावांचा बळी गेला. समुद्राच्या लाटेत उभे राहून सेल्फी काढताना कितीतरी जणांना त्या लाटेने परत जाताना आपल्यासोबत नेले. लोणावळा, महाबळेश्‍वर तसेच अनेक घाटांच्या उतरत्या जागांवर उभे राहून काढलेली सेल्फी अखेरची ठरली. पाय घसरून दरीत कोसळून कितीतरी जणांचा बळी गेला आहे. भिवंडीतील शहबाज आणि शाह आलम हे दोघे भाऊ भिवंडी येथील कामवारी नदीत चाविंद्रा पेट्रोल पंपाच्यामागे मासे पकडण्यासाठी आले होते. त्यांची आईदेखील सोबत होती. मासेमारी करत असताना सेल्फी घेण्याच्या नादात एकाचा पाय घसरुन तो पाण्यात बुडाला. भावाला बुडताना पाहून दुसर्‍यानेदेखील पाण्यात उडी घेतली; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने एकापाठोपाठ दोन्ही सख्ख्या भावांना जलसमाधी मिळाली. काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करण्याआधी मुलामुलींनी आधी आपल्या आईवडीलांचा तरी विचार करायला हवा. कारण अशा घटनांमुळे आईवडीलांची होणारी वाईट अवस्था शब्दांमधून सांगता येणार नाही. मुलांना जन्मापासून लहानाचे मोठे करणे, त्यांना काय हवे नको ते बघणे, त्यांचे लाड पुरवणे, त्यांना शिक्षण देऊन नोकरीला लावणे आणि अचानक मुलांनी इशी एक्झिट घेणे हे कधीच न पचणारे दुःख असते. म्हातारपणाची काठी अशी एकाएकी हातातून निसटल्याने होणारी जखम ही कधीच भरुन काढता येणारी नसते. त्यामुळे आईवडील पूर्णपणे खचतात. काहीजण आजारी पडतात आणि त्याच दु:खात जगाचा निरोप घेतात. अलीकडच्या काळात एक दांपत्य, एक अपत्य ही संकल्पना रुजत चालली आहे. अशात जर एकुलते एक अपत्य गेले, तर मग संबंधित कुटुंबाच्या दुखाला पारावर राहत नाही. आयुष्यातील महत्त्वाचे क्षण टिपण्याच्या नादात तो क्षण अखेरचा होणार नाही, याची काळजी घेतली, तर अधिक चांगले होईल. इतरांना दुःखाच्या दरीत सोडून आपण इहलोकाचा प्रवास करायचा, हे चांगले नाही, याचे भान ठेवले पाहिजे.

COMMENTS