सिद्धीबागेतील मासा झाला जिवंत..अन..हसरा… तीन दिवसात झाले नूतनीकरण, दानशुरांनी केली मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिद्धीबागेतील मासा झाला जिवंत..अन..हसरा… तीन दिवसात झाले नूतनीकरण, दानशुरांनी केली मदत

मागील 20 वर्षांपासून मृतावस्थेत असलेला मासा चक्क नूतनीकरणानंतर जिवंत झाला व हसराही झाला.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ईडीचा दणका
वापरलेले मेडिकल साहित्य चक्क फेकले रस्त्याच्या कडेला
रयतच्या शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकविणार : खा. शरद पवार

अहमदनगर/प्रतिनिधी-मागील 20 वर्षांपासून मृतावस्थेत असलेला मासा चक्क नूतनीकरणानंतर जिवंत झाला व हसराही झाला. महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे उद्यानातील म्हणजेच नगरच्या प्रसिद्ध सिद्धीबागेतील मत्स्यालयाची ही कथा. मनपाच्या उद्यान विभागाचे प्रमुख मेहेर लहारे यांनी पुढाकार घेऊन व दानशुरांच्या मदतीने सिद्धीबागेतील मत्स्यालयाचे नूतनीकरण केल्याने येथील मासा आता आकर्षक झाला असून, त्यात दोन फिश टँक बसवल्याने अनेक रंगीबेरंगी जिवंत माशांचे पाण्यात मनसोक्त विहरणे बालगोपाळांना नवा आनंद देणार आहे. 

महापालिकेची सिद्धीबाग म्हणजे नगरमधील प्रसिद्ध ठिकाण. अनेक पिढ्या या बागेत खेळून लहानच्या मोठ्या झाल्या आहेत. सिद्धीबागेत फेरफटका व तेथील खेळणींचा आनंद लुटण्यासह तेथील हिरवळीवर भेळीचा आस्वाद घेण्याचा आनंद अनेकांनी लुटला आहे. या बागेत सुमारे 15 ते 20 फूट लांबीचा भव्य लोखंडी मासा आहे. पूर्वी या माशाच्या पोटात म्हणजे पोकळीत फिश टँक ठेवून त्यात जिवंत मासे सोडले होते. ते पाहण्यात बालगोपाळ व मोठ्या व्यक्तीही रमून जात होते. पण नंतर मनपाच्या उद्यान विभागातील कर्मचार्‍यांची अपुरी संख्या तसेच मनपातील राज्यकर्त्यांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे ही बाग व तेथील खेळणीही दुर्लक्षित झाली होती. माशाच्या पोटातील फिश टँक गायब झाल्याने मग मासाही एकाकी पडला. परिसरात असलेली छोटी रेल्वेगाडीही बंद पडली व पाठीमागील बाजूस असलेली खेळणीही मोडकळीस आली. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून हा मासा दुर्लक्षित असल्याने मृतप्राय झाला होता. पण लहारे यांच्या पुढाकाराने आता त्याला पुन्हा जिवंतपणा आला आहे.

जाधव-ढोणे यांची मदत

महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे उद्यानातील मत्स्यालयाचे नूतनीकरण करून नागरिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. मागच्या 3 दिवसांमध्येच याचे नूतनीकरण पूर्ण केले गेले आहे. मागील 20 वर्षांपासून ही वास्तू दुर्लक्षित राहिली होती. मागील दोन-तीन पिढ्यांच्या आठवणींना यामुळे नक्कीच उजाळा मिळणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमासासाठी उपमहापौर मालनताई ढोणे व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह निसार आर्ट्स, उद्यान विभागाचे अभिजीत रोहोकले व इतर कर्मचार्‍यांंनी मोठे योगदान दिले आहे. मत्स्यालयातील फिश टँक  जाधव यांच्या मित्र मंडळाकडून भेट स्वरूपात मिळाले आहे.

खासगीकरण रखडले

महापालिकेने ठराव करून सिद्धीबाग व बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यान खासगीकरणातून चालवण्यास देण्याचे ठरवले आहे. पण यास प्रतिसाद मिळत नाही. मनपाकडेही पुरेसे कर्मचारी नसल्याने सिद्धीबागेची देखभालही व्यवस्थित होत नाही. येथील खेळणीही तुटली आहे. आता मत्स्यालयाचे नूतनीकरण केले असले तरी त्याखाली असलेले कारंजे सुरू करणे, तेथे वीजप्रकाश लावणे तसेच त्याभोवती लोखंडी संरक्षक जाळी उभारण्याचे काम बाकी आहे. उद्यान विभाग यासाठी दानशुरांची मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मनपाच्या पदाधिकार्‍यांनीही यात योगदान देण्याची गरज आहे.

COMMENTS