प्रतिनिधी : पुणेआपले सरकार असूनही, आपल्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे गंभीर आहे. आमच्या शिवसैनिकांचे वाघाचे काळीज आहे. जर अशाप्रकार
प्रतिनिधी : पुणे
आपले सरकार असूनही, आपल्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर हे गंभीर आहे. आमच्या शिवसैनिकांचे वाघाचे काळीज आहे. जर अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर आम्हाला अंगावर घ्यावे लागेल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला दिला.
राऊत हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिरूरमध्ये ते बोलत होते. कालपासून जुन्नर, मंचर, चाकण, शिक्रापूर, संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या बाबतीत उत्साहाचे वातावरण दिसून आले. असे वातावरण अनेक वर्षांपासून इथं आहे.
पाण्याच्या प्रश्नावर लढणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. जर सरकार आपलं असूनही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होत असतील तर गंभीर आहे. याची नोंद घेतली आहे. मी या विषयावर शरद पवार आणि दिलीप वळसे यांच्याशी बोलेन. आमचे वाघाचे काळीज आहे.
आतापर्यंत अनेकांना अंगावर घेतले आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होतात. जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा म्हणायचो आमचं सरकार आल्यावर बघू. मात्र आता बघयाची वेळ आली आहे.
आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. अशाप्रकारे त्रास देणार असाल तर तुम्हालाही शिंगावर घेण्यासाठी मागेपुढे बघणार नाही, असा थेट इशारा राऊत यांनी राष्ट्रवादीला दिला.
सरकार आपले आलं तरी प्रश्न जुनेच आहेत. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं. मात्र स्थानिक पातळीवरील जे वतनदार असतात त्यांनी थोडं संयमाने वागावे. काही झालं तरी तुम्हाला आमच्या बरोबरच संसार करायचा आहे.
भाजपासोबत सरकार होतं तेव्हा ही हेच होत होतं. त्यांनी आपलं ऐकलं नाही तर तुम्हीही मुख्यमंत्री आमचा आहे असं सांगा. सरकारमधली माणसं चांगली असतात. मात्र स्थानिक राजकारणाचा विषय येतो तेव्हा एकमेकांवर कुरघोड्या सुरू होतात.
आधीच्या सरकारमध्येही हाच त्रास होता. आपण एवढं ताकदवान व्हायला की पाहिजे पुढच्या वेळेला तो निवडून येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं ते म्हणाले.
शिवसेना हा तप्त लाव्हा आहे. आता शिवसेना अजिबात मागे हटणार नाही. आमचं बळ हे आमच्या मनात आणि मनगटात आहे. आज आमदार आहेत. उद्या असतील की नाही माहीत नाही. सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करा.
शिवसेनेला जेवढं जास्त रेटाल तेवढी ती पुढे जाईल. शिवसेनेवर जेव्हा वार झाले तेव्हा रक्ताच्या थेंबागणिक शिवसेना वाढत गेली. त्यामुळे शिवसैनिकांसारखे वागा. लोकांना एकत्रित घेऊन काम करा. बाळासाहेबांचा जो मंत्र आहे ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण ते करा, असं आवाहनही त्यांनी केलं.
COMMENTS