अहमदनगर / कल्याण: प्रतिनिधी महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ 79 टक्केच वसुली होऊ शकली. परिणा
अहमदनगर / कल्याण: प्रतिनिधी
महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ 79 टक्केच वसुली होऊ शकली. परिणामी तब्बल 661 कोटी रुपयांची वीज देयक थकबाकी वसूली बाकी आहे. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत वसूली अभावी थकबाकीत राहणारी ही रक्कम महावितरणचे संकट अधिक वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी दिला आहे.
कल्याण येथे आयोजित कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, जळगाव आणि कोकण परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. चालू वीजबिल व थकबाकीतील रक्कम (सुमारे 20 टक्के) वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य म्हणजे संबंधित महिन्याचे वसुलीचे उद्दिष्ट असते. कोकण प्रादेशिक विभागात वाशी मंडल कार्यालय वगळता सप्टेंबर महिन्याच्या वसुलीचे उद्दिष्ट उर्वरित 14 मंडल कार्यालयांना पूर्ण करता आलेले नाही. यात पेण, ठाणे, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचा समावेश आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे यांनी अचूक नियोजन, उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम प्रभावीपणे राबवून ऑक्टोबर महिन्यात वीजबिल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. याशिवाय अकृषक वीज वापर वाढवणे, वीजहानी कमी करून महसूलात वाढ, ऑक्टोबर हिटमुळे कृषिपंप व इतर ग्राहकांचा वाढता वीजवापर लक्षात घेऊन वितरीत होणाऱ्या प्रत्येक युनिट विजेचे बिलात रुपांतर व त्याची वसुली तसेच गतिमान ग्राहक सेवा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित होते.
ग्राहकांनाही सहकार्याचे आवाहन
आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष फिल्डवर याची अंमलबजावणी, पडताळणी व वसुलीचा आढावा घेण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे हे स्वत: फिल्डवर राहणार आहेत. या भेटीत वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची पूर्वसूचना त्यांनी दिली आहे. तर महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी आपले थकीत असलेले वीजबिल वेळेत भरून कर्मचाऱ्यांना वसुलीच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना केले आहे.
COMMENTS