देवळाली प्रवरा / प्रतिनिधीमहात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या हरभरा वाणांमुळे राज्याच्या हरभरा उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली असुन, राज्या
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या हरभरा वाणांमुळे राज्याच्या हरभरा उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ झाली असुन, राज्याला कडधान्यामध्ये स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करणेसाठी मोठे योगदान दिलेले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने आत्तापर्यंत हरभर्याचे 14 वाण विकसीत केलेले आहेत. यापैकी चार वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत करण्यात आलेले आहेत. आज राज्याच्या 40 टक्के क्षेत्रावर राहुरी विद्यापीठाच्या हरभरा वाणांची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या हरभर्याच्या वाणांनी राज्यातील शेतकर्यांना समृध्द केले आहे. या वाणांनी आत्तापर्यंत राज्यातील हरभरा उत्पादक शेतकर्यांना रु. 29120.37 कोटी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य हरभरा पिकाच्या क्षेत्र व उत्पादनामध्ये देशामध्ये दुसर्या क्रमांकावर असून, सन 2020-21 मध्ये राज्यात 25.94 लाख हे. क्षेत्रावर या पिकाची लागवड करण्यात आली आणि त्यापासून 28.66 लाख टन इतके उच्चांकी उत्पादन मिळाले. राज्याची उत्पादकता 1105 किलो प्रति हेक्टर आहे. सन 2010-11 च्या तुलनेत आज हरभर्याचे 86 टक्के क्षेत्र, 118 टक्के उत्पादन आणि 18 टक्क्यांनी उत्पादकतेत वाढ झालेली आहे. पारंपारीक पध्दतीमध्ये हरभरा हे पीक स्थानिक वाणांचे बियाणे वापरुन केले जात होते. परंतु, अलिकडील काळात कृषि विद्यापीठाच्या संशोधनातुन शेतकरी बांधवांना हवे असलेले जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी तसेच मर रोग प्रतिकारक्षम वाण उपलब्ध झाल्यामुळे हरभरा क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील या पिकाखालील वाढते क्षेत्र पाहता हरभरा हे पीक रब्बी हंगामातील प्रथम क्रमांकाचे नगदी पीक झाले आहे. हरभरा पिकाच्या वाढीबरोबर जमिनीतील ओलावा कमी होत जातो आणि पाण्याचा ताण वाढु लागतो. अशा प्रतिकुल परिस्थितीत इतर पिकांच्या तुलनेत अधिक उत्पादन देणारे आणि जमिनीचा कस वाढवणारे हरभरा पीक रब्बी हंगामासाठी वरदान आहे. कडधान्य सुधार प्रकल्पाने हरभरा पिकापासुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची शिफारस केलेली आहे. यामध्ये योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत, अधिक उत्पादन देणार्या आणि रोगप्रतिकारक्षम वाणांचा वापर, बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धनाचा वापर, वेळेवर पेरणी आणि पेरणीचे योग्य अंतर, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि रोग व किडींपासून पिकाचे संरक्षण याबाबींचा सामावेश होतो.
महात्मा फुले कृषि विदयापीठाने आजपर्यंत हरभरा पिकामध्ये एकुण 14 वाण प्रसारित केले असुन यामध्ये देशी हरभर्याचे विजय, विशाल, दिग्वीजय, विक्रम, विक्रांत आणि विश्वराज तर काबुली हरभर्याचे विराट आणि कृपा हे अधिक उत्पादनक्षम वाण असुन शेतकर्यांमध्ये लोकप्रिय आहेत. देशी वाणांच्या दाण्यांचा रंग आकर्षक असल्यामुळे चांगला बाजारभाव मिळतो. दिवसेंदिवस शेती उदयोगात होणार्या मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिक पध्दतीने काढणी करता येईल असा उंच वाढणारा देशी हरभर्याचा वाण फुले विक्रम हा विद्यापीठाने विकसीत केला आहे. त्यामुळे कंबाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने पिकाची काढणी करता येते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाद्वारे विकसित करण्यात आलेल्या हरभरा पिकांच्या वाणांचे देशाच्या कडधान्य स्वयंपुर्णतेमध्ये महत्वाचे योगदान आहे. राज्यात प्रथमच यांत्रिक पध्दतीने काढणी करणेसाठी फुले विक्रम हा वाण प्रसारित केला आहे. हरभरा पिकामध्ये जिरायत, बागायत आणि उशिरा पेरणीसाठी एकुण 14 वाण प्रसारित केल्यामुळे राज्यातील शेतकर्यांची आर्थिक प्रगती झाली असुन हरभरा उत्पादनामध्ये राज्य दुसर्या क्रमांकावर आहे तसेच भारत सरकारने सुरु केलेल्या सीड हब प्रकल्पांतर्गत शेतकर्यांच्या शेतावर बियाणे तयार करुन ते विदयापीठ परत विकत घेते व त्यावर प्रक्रिया करुन ते शेतकर्यांना उपलब्ध केले जाते.
कुलगुरु डॉ. पी.जी.पाटील
COMMENTS