राहुरी तालुक्यात दुसरा डोस घेणारांना प्राधान्य ; लसीकरण नव्या पॅटर्नमुळे गर्दीवर नियंत्रण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यात दुसरा डोस घेणारांना प्राधान्य ; लसीकरण नव्या पॅटर्नमुळे गर्दीवर नियंत्रण

केंद्र व राज्य सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या शहरांसह गावोगावच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली आहे.

विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा
आमच्यावर अन्याय करा तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो : सुजय विखे
देवरेंविरोधात आंदोलनाचा पीपल्स हेल्पलाईनचा इशारा

अहमदनगर/प्रतिनिधी- केंद्र व राज्य सरकारने 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या शहरांसह गावोगावच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुरी तालुक्यात मात्र लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे व त्यानंतर युवा वा मध्यमवयीनांना पहिला डोस दिला जात आहे. यामुळे अनेक ज्येष्ठांचे दोन्ही डोस होऊन त्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर तरुण पिढीला पहिला डोस मिळत असल्याने त्यांचेही हळूहळू लसीकरण मार्गी लागत आहे. राहुरीचा लसीकरणाचा हा पॅटर्न सध्या जिल्हाभरात चर्चेत आहे.

    सुरुवातीच्या काळामध्ये लोकांमध्ये लसबाबत संभ्रम असल्याने ती घेण्याचे प्रमाण कमी होते. त्यावेळी वारंवार आवाहन करावे लागले, ज्येष्ठांचे लसीकरण करून घेण्याचे सांगण्यात आले. पण त्यांचे प्रमाण कमी असल्याने मग शासकीय सेवकांचे लसीकरण केले गेले. परंतु नंतर जेव्हा कोरोन रुग्णसंख्या वाढत गेली, तेव्हा लसीकरण केंद्रांवरही गर्दी वाढली. त्यामुळे लसीची कमतरता भासू लागली. तशात केंद्र व राज्य सरकारने 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण खुले केल्याने तरुण पिढीची गर्दीत भर पडली. त्यामुळे राहुरी तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर काहीशी गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे नगर विकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावर प्रशासन आणि नागरिक, वैद्यकीय तज्ज्ञांच्या समविचारातून त्यावर उपाययोजना केल्या. ज्यांनी पहिला डोस घेतला, त्यांना 70 टक्के प्राधान्य देण्यात आले. तर पहिला डोस घेणार्‍यांना 30 टक्के प्राधान्य देण्यात आले. गावनिहाय याद्यांनुसार क्रमवारी पद्धतीने लसीकरण करण्यात आले. यात राजकारणविरहित काम करून वशिलेबाजी न करता जसा पुरवठा-तसे लसीकरण अशी पद्धत राबविण्यात आली व लस घेणार्‍या लाभार्थ्यांना निरोप देण्यात येत असल्याने आता तालुक्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दीही होत नाही. राहुरी तालुक्यात वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दुसरा डोस दिला. क्रमवारीनुसार ज्या क्रमाने पहिला डोस घेतला, त्यानुसार निरोप देण्याची व्यवस्था केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिला डोस गावातच आणि दुसरा डोस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये द्यायची व्यवस्था केला गेला.

नगर तालुका व पाथर्डीतही नियोजन

नगर जिल्ह्याला जो लसीचा पुरवठा केला जातो, त्यांची जिल्ह्यातील 160 लसीकरण केंद्रांतर्गत वेगवेगळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय यांच्यात समप्रमाणामध्ये विभागणी करण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर नगर व पाथर्डी तालुक्यात प्रशासनाच्या बैठका तनपुरेंनी घेतल्या. प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीला अनुसरून उपाययोजनांचे नियोजन केले गेले. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बैठकांतून सूचना केल्या गेल्या. तालुक्यामध्ये ज्यांचे पहिले डोस घेऊन झालेले आहेत, त्यांना वेळेमध्ये दुसरा डोस मिळण्यास प्राधान्य असले पाहिजे, असे सांगितले गेले व त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली गेली. तसेच पहिला डोस घेणारांची संख्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर किती असेल, याची माहिती संकलित करून ज्यांना पहिला डोस दिलेला आहे, त्यांना प्रशासनामार्फत निरोप देऊन त्यांचा दुसरा डोस केला गेला. अशा पद्धतीचे नियोजन स्थानिक पातळीवर केले गेल्याने नगर तालुका व पाथर्डी तालुक्यांतील लसीकरणही बर्‍याचअंशी सुरळीत झाले आहे.

राज्यात राहुरी पॅटर्न जाणार

दुसरा डोस घेणारांना आधी प्राधान्याचा हा फॉर्म्युला प्रायोगिक तत्त्वावर राहुरी तालुक्यामध्ये सुरू आहे. यामुळे गावागावांमध्ये गर्दी न होता व वशिलेबाजी न होता पहिला डोस मिळालेल्यांना दुसरा डोस मिळाला तसेच नव्याने तरुणाईही काही प्रमाणात पहिला डोस मिळाला. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही स्थानिक पातळीवर अशाच पद्धतीने नियोजन केले गेले आहे. सध्या राहुरी तालुक्यात पथदर्शी ठरणारा फॉर्म्युला आता राज्यात वापरण्याचे प्रयत्न असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. राज्यात कोरोना प्रसाराचा वेग काही ठिकाणी कमी होताना दिसत असला तरी लसींच्या कमी उपलब्धतेमुळे लसीकरणात येणारा व्यत्यय आणि लस केंद्रांवर होणारी गर्दी कोरोना संक्रमण वाढते काय, याची भीती वाढवत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध अंमलबजावणी राहुरी तालुक्यात सुरू केली आहे. लसींची उपलब्धतेनुसार दुसरा डोस घेणारांना प्राधान्य दिल्याने अनेक ज्येष्ठांचे पूर्ण लसीकरण झाले आहे.

COMMENTS