रात्री 9 पर्यंत ऑर्डर घ्या… फक्त जेवण्याच्यावेळीच मास्क काढू द्या; हॉटेल व बार मालकांना सक्त सूचना, कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रात्री 9 पर्यंत ऑर्डर घ्या… फक्त जेवण्याच्यावेळीच मास्क काढू द्या; हॉटेल व बार मालकांना सक्त सूचना, कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक

अहमदनगर/प्रतिनिधी-दीड-दोन महिन्यांपासून वैतागलेल्या हॉटेल व बार मालकांसाठी शुक्रवारची सायंकाळ दिलासादायक ठरली. रात्री 10पर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्

अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाणीचा गुन्हा दाखल
अहमदनगर – औरंगाबाद रेल्वे मार्गाला चालना देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; देवगड, नेवासा व शनिशिंगणापूरला होणार अधिक लाभ
शेवगावच्या बनावट सोने प्रकरणी 160 जणांना नोटिसा ;गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांचा समावेश, म्हणणे मांडण्याचे पोलिसांचे आदेश

अहमदनगर/प्रतिनिधी-दीड-दोन महिन्यांपासून वैतागलेल्या हॉटेल व बार मालकांसाठी शुक्रवारची सायंकाळ दिलासादायक ठरली. रात्री 10पर्यंत हॉटेल व बार सुरू ठेवण्यास परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली असल्याने या व्यावसायिकांमध्ये खुशीची लहर पसरली आहे. मात्र, रात्री 9पर्यंतच ग्राहकांची जेवणाची ऑर्डर घ्यावी तसेच ग्राहकांना फक्त जेवणाच्यावेळीच मास्क काढण्याची मुभा राहील तसेच हॉटेल-बारमधील कर्मचार्‍यांचे दोन्ही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले असले पाहिजे, अशी बंधनेही टाकण्यात आली आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश शुक्रवारी दुपारी जारी केले. येत्या रविवारपासून (15 ऑगस्ट) हे शिथीलीकरण लागू राहणार आहे. या नव्या आदेशानुसार सकाळी 7 ते दुपारी 4पर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी असल्याबाबतचे आतापर्यंतचे निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र, शनिवार व रविवारी सर्व व्यवहार बंद ठेवायचे की सुरू ठेवायचे, याबाबत संभ्रमावस्था आहे. पण नवे निर्बंध शिथीलीकरण रविवारपासून लागू होणार असल्याने शनिवार-रविवार सर्व बंदचा आदेशही रद्द झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, श्रावण महिना सुरू होण्याआधी निर्बंध शिथीलीकरणाची अपेक्षा हॉटल व बार व्यावसायिकांची होती. आषाढ महिन्यात शेवटच्या काळात यामुळे चांगला धंदापाणी होईल, अशी आशाही त्यांना होती. पण आता श्रावण सुरू झाल्यावर निर्बंध शिथील झाल्याने थोडीशी नाराजीही त्यांच्यात आहे. पण निर्बंध शिथील झाल्याचा आनंद मात्र व्यक्त केला जात आहे.

असे आहेत नवे आदेश
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी नवे आदेश जारी केले असून, त्यात म्हटले आहे की, शासनाकडील ब्रेक द चेन-सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी दिनांक-15/08/2021 पासून पुढील आदेश होईपावेतो पुढील निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले जात आहेत. 1) उपहारगृहे- खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. अ) उपहारगृह/बारमध्ये प्रवेश करताना, प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. ब) उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह/बारमध्ये काम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील. क) वातानुकूलित उपहारगृह/बार असल्यास वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील. ड) प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील. इ) उपहारगृह/बारमध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. फ) उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील.या निर्बंधांनुसार उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह/बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 9 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

दुकाने-मॉल्ससाठीही नवे नियम
जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10 वा.पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत
आहे. दुकानात काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल. शॉपिंग मॉल्स – जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणार्‍या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहिल व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

खेळ व योगा सेंटरला नियम
जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा यासाठी नवे नियम करण्यात आले आहेत. वातानुकूलित तसेच विनावातानुकूलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वा.पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, या संस्था वातानुकूलीत असल्यास वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील. इनडोअर स्पोर्टसमध्ये इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

सीकरणाचे बंधन
कार्यालये/औद्योगिक/सेवाविषयक आस्थापनांबाबतही नवे आदेश असून, यानुसार सर्व शासकीय/निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे. तसेच ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचार्‍यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल तर त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचार्‍यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापनांतील कर्मचार्‍यांना घरून काम करणे शक्य आहे, अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी, कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचार्‍यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. तसेच खासगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळ्यांना गर्दीची मर्यादा
खुल्या प्रांगणातील-लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण-लॉन-मंगल कार्यालय-हॉटेलमधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्याच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण-लॉनमध्ये होणार्‍या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. तर बंदिस्त मंगल कार्यालय-हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत असेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकार्‍याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर तसेच संबंधित हॉटेल-कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल-मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय, हॉटेल, लॉन व्यवस्थापन, भोजन व्यवस्थापन, बॅडपथक, भटजी, फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व संलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील. दरम्यान, ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे, त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहिल.

त्याचा खर्च त्यांनीच करावा
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड़ प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध अशा सर्व निर्बंधांचे पासन करणे अनिवार्य आहे.तसेच सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक-व्यवस्थापनाने त्यांच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचार्‍यांची यादी (लसीकरण माहिती-प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षम प्राधिकार्‍यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध
करुन द्यावी. दुकाने, उपहारगृहे, बार, मॉल्स, कार्यालये व औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जंतुकीकरण व सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल. तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेंसर व बायोमेडीकल वेस्ट (वापरतलेले मास्क व टिशु पेपर्स यांची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपध्दतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची असणार आहे.

COMMENTS