राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा !

राज्यात कधी नव्हे ते आता राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना टार्गेट करत रोज नवी माहिती सादर करून, त्यां

मंडल आयोगाने कर्नाटकात मराठा ओबीसी आणि एसटी ठरवला; महाराष्ट्रात का नाही ? 
विवेकाचा नंदादीप पेटत राहो !
पक्षांच्या समर्थन-विरोधात जनता नाही ! 

राज्यात कधी नव्हे ते आता राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना टार्गेट करत रोज नवी माहिती सादर करून, त्यांनी वानखेडे यांना जेरीस आणल्यानंतर आता मलिकांनी थेट भाजपच्या नेत्यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. मलिक यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज व्यावसायिकांनी संरक्षण देण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. तर त्यानंतर फडणवीस यांनी देखील मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून आपण त्याचे पुरावे माध्यमांना आणि शरद पवारांना देणार असल्याचे जाहीर केले.
दिवाळीपूर्वीच राजकीय बॉम्ब फोडण्याची सुरू झाली आहे. यातून हा सामना आता राष्ट्रवादी काँगे्रस विरुद्ध भाजप असा रंगतांना बघायला मिळत आहे. हा सामना महाराष्ट्राला रसातळाला घेऊन जातांना दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी त्यातून काही साध्य होणार नाही, हे एव्हाना भाजप आणि राष्ट्रवादी काँगे्रसला देखील माहित आहे. तरी हा नसता उपदव्याप कशासाठी सुरू आहे, याचे उत्तर दोन्ही पक्षांकडे नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या असून, हे भांडण सत्ताधारी असणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसकडून उकरून काढण्यात आले आहे हे विशेष. त्याचा शेवट कसा आणि कुठे होतो, याची उत्सुकता महाराष्ट्राला असली तरी, दाऊद आणि शरद पवारांचे संबंध असल्याच्या आरोपांचे काय झाले, तेच या आरोपांचे होणार आहे. थोडक्यात यातून काहीही निष्पन्न होणार नाही. मग महाराष्ट्रात सनसनाटी निर्माण करून नेमके काय मिळवायचे, हे राज्यकर्त्यांनी स्पष्ट करावे. सत्ताधार्‍यांकडे तपास यंत्रणा असतांना, त्यांनी चौकशा करून, थेट न्यायालयात खटला दाखल करू शकतात. मात्र रोजच माध्यमांसमोर येऊन रोज नवा आरोप करायची आता फॅशनच रुढ होतांना दिसून येत आहे. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याऐवजी रोज सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न विकासासाठी घातकच म्हणावा लागेल. कारण महाराष्ट्र एक संस्कृतीप्रधान राज्य आहे. फुले, शाहु, आंबेकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला जसे विरोधक बदनाम करू इच्छित आहे, तसेच सत्ताधारी देखील बदनाम करत आहे. कुणाचे संबंध अंडवर्ल्डशी तर कुणाचे ड्रग्ज पॅडलरशी. महाराष्ट्रात नेमके काय सुरू आहे. याला कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. मलिकांनी यात आता थेट फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत त्यांना या आरोपांत ओढले आहे. मलिक राजकारण्यांवर आरोप करत आहे, ते ठिक आहे, पण राजकीय व्यक्तींच्या कुटुंबावर देखील त्यांची चिखलफेक सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणांचे शिंतोडे उडत आहे. हा फोटो ट्विट करत मलिक म्हणाले की, सार्वजनिक जीवनात कोण कुणाच्या सोबत फोटो काढते, यावर आपला काहीच आक्षेप नाही. पण एक ड्रग्ज पेडलर मुख्यमंत्र्यांचा अभिनय असलेल्या गाण्याला फायनान्स करतो, यावरूनच सर्व स्पष्ट होतो. देवेंद्रजींचे जयदीप राणाशी असलेले नाते घनिष्ठ आहे. गणपती दर्शनासाठी राणा व फडणवीस एकत्र होते. महाराष्ट्रातील ड्रग्जच्या मोठ्या साखळीशी याचा संबंध आहे. भाजपचे लोक का सुटत आहेत. त्यांच्या नाकाखाली ड्रग्जचा धंदा सुरू होता. भाजपात काही ड्रग्जशी संबंधित लोक आहेत. डॅग्जचा खेळ कुठे ना कुठे देवेंद्रजींच्या आशिर्वादाने सुरू होता, असा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांच्या आरोपांनंतर फडणवीस यांनी आपल्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, नवाब मलिकांनी लवंगी फटाका लावलाय आता त्यांनी लक्षात ठेवावे दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडणार आहे. कारण मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे तुमच्या समोर मांडेन. तसेच शरद पवार यांच्याकडे नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असलेले पुरावे पाठवणार आहे. आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल. दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना थेट रंगणार आहे. मात्र यामुळे राज्यातील अडचणी कमी होणार नाही. शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढले आहे, त्याचप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांनी काही दिवसांत 28 जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. बेरोजगारी मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे महाराष्ट्राला विकासाभिमुख वाटेवर घेऊन जाण्यासाठी आता तरी, या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शांत होतील अशी अपेक्षा करू या. आणि जर राजकीय नेत्यांजवळ पुरावे असतील तर त्यांनी ही लढाई न्यायालयात लढाई, एकमकेांना तुरुंगात पाठवावे, पण महाराष्ट्रांचे सुसंस्कृत वातावरण कदापि अशांत करू नये.

COMMENTS