Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणात जातीचे सेल नको का म्हणताहेत गडकरी ?

जगातील कोणतीही व्यवस्था जी माणसासाठी बनली आहे; ती राजकीय आहे! राजकारण, याविषयी कोणी फारसं बोलत नसले किंवा मी राजकारण करत नाही असं म्हणत असले, तरी

धर्मापेक्षा लोकशाही मोठी! 
वृध्द म्हणून संभावना करण्यापर्यंत घसरले ! 
राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !

जगातील कोणतीही व्यवस्था जी माणसासाठी बनली आहे; ती राजकीय आहे! राजकारण, याविषयी कोणी फारसं बोलत नसले किंवा मी राजकारण करत नाही असं म्हणत असले, तरी, बहुतांश लोक किंबहुना, जनता संपूर्णपणे राजकारणाशी निगडित असते. त्याचं मुख्य कारण की, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी तो करत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा अर्थकारणाशी संबंध असतो; आणि अर्थकारणाचे निर्णय हे नेहमीच राजकीय सत्ता घेते. त्यामुळे, सगळीच माणसं राजकारणाच्या परिघात येतात, असा मार्क्सचा सिद्धांत ही सांगतो. परंतु, भारतीय समाज व्यवस्था ही जातीनिहाय असल्यामुळे, मुख्य राजकीय पक्षांनी समाजकारण करत असताना राजकारण करण्याऐवजी, राजकीय पक्षांमध्ये जातनिहाय राजकारण उभे करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये, मागासवर्गीय सेल, अल्पसंख्यांक सेल, ओबीसी सेल असे वेगवेगळे विभाग निर्माण केले जातात. परंतु, समाज व्यवस्थेतील वरच्या स्थानी असलेल्या जातींचे असे कोणतेही सेल राहत नाही.  राजकारणात हे सेल  दुय्यम राजकारणाचा भाग बनतात आणि परिणामी ते सत्तेच्या परिघातच येत नाहीत; आता, हा अनुभव केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रत्यक्षात बोलून दाखवला.  हे बोलण्यासाठी त्यांनी योग्य वेळ निवडली ती म्हणजे, नागपूर भाजपच्या विभागीय कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगाचा! यावेळी, त्यांनी महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना जातीचे प्रकोष्ट किंवा सेल निर्माण करू नका; यामुळे, पक्ष वाढत नाही किंबहुना त्याचा पक्षाला कोणताही फायदा होत नाही, असा थेट सल्ला दिला. कारण, असाच अनुभव त्यांनी यापूर्वी घेतलेला आहे. त्याचा कोणताही फायदा पक्षाला मिळत नाही, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. जेव्हा जातीचा सेल असतो, तेव्हा, त्या समाजातील व्यक्ती ज्या पक्षाशी जुळते त्या पक्षाविषयीच त्या समाजामध्ये त्या व्यक्तीला स्वीकारण्याचा दृष्टिकोन नाकारला जातो.  परिणामी त्या व्यक्तीला त्याच जात समाजातून पाठिंबा राहत नाही, आणि मग तो व्यक्ती त्याच जातीत एकाकी पडतो; असा अनुभव आहे. अर्थात, नितीन गडकरी यांचे हे वक्तव्य अनुभवावर आधारलेले असल्यामुळे त्यामध्ये निश्चितपणे तथ्य आहे. राजकीय पक्षांनी जातीचे सेल निर्माण करणे, हीच प्रक्रिया मुळात भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या राजकारणाच्या विरोधात आहे.  वरच्या जात समूहांनी राजकीय पक्षांचे सत्तास्थान सांभाळताना इतर समूहांना जातीय सेलमध्ये बंदिस्त करून, त्यांना दुय्यम पातळीवर राजकीय व्यक्ती म्हणून स्वीकारण्याचा तो प्रयत्न जसा आहे; तसाच, तो त्या जात समूहाचा उपयोग केवळ राजकीयदृष्ट्या करून घेण्याचे ही उद्दिष्ट त्याच्यामध्ये दिसतं. जे सत्ताकारण राजकारणामध्ये संविधानाला अपेक्षित नाही. अर्थात आपल्या भारतात सर्वच राजकीय पक्ष जातींचे राजकीय सेल बनवून आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, अशा प्रकारच्या कोणत्याही सेलला त्या जातीत स्वीकार मिळत नाही. परिणामी तो सेल केवळ एका व्यक्तीपुरता  त्याच्या एका टोळक्यापुरता बंदिस्त होतो.  त्याचा परिणाम कोणत्याही राजकीय पक्षाला शक्ती मिळण्यात होत नाही. या उलट राजकीय पक्षांच्या मुख्य प्रवाहामध्येच अशा समूहांना जर सामावून घेतले तर त्यांची प्रतिमा निश्चितपणे त्या जात समूहांमध्ये त्या प्रवर्गांमध्ये चांगली उमटेल आणि त्याचा राजकीय पक्षांनाही थेट फायदा मिळू शकतो.

COMMENTS