मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याकडे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा मांडला आहे.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून त्यांच्याकडे कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा मुद्दा मांडला आहे. कांजूरच्या मेट्रोच्या जागेवर केंद्र सरकारने दावा केला आहे. केंद्राने ही जागा राज्याला द्यावी, अशी मागणी ठाकरे यांनी मोदींकडे केली आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्याकडे हा मुद्दा मांडून एकप्रकारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शह दिला आहे.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मोदी यांची भेट घेतली. तब्बल पावणेदोन तासांच्या या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पंतप्रधानांकडे एकूण 12 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात कांजूर कारशेडचा मुद्दाही होता. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी मोदी यांच्याकडे करण्यात आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदी यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रेही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदी यांनी लक्ष घालतो असे सांगितले. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असे ठाकरे म्हणाले. कांजूरमार्ग येथील मेट्रोची जागा राज्याची आहे की केंद्राची यावरून वाद सुरू होता. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाने मेट्रोच्या कामाला शह दिला होता. त्यामुळे राज्याने पर्यायी जागेचा शोध सुरू केला होता; मात्र पर्यायी जागेपेक्षा कांजूरचीच जागा मिळावी म्हणून ठाकरे सरकारने प्रयत्न सुरू केले होते. आजच्या भेटीत त्यांनी मोदी यांच्याकडे ही जागा राज्याला देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मोदी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांनी कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड उभारण्यास विरोध केला होता. कारशेडसाठी मेट्रोचीच जागा योग्य असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे कांजूरच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक चकमकीही झडल्या होत्या; मात्र आता मुख्यमंत्र्यांनी हा विषय थेट मोदी यांच्या कोर्टात टाकला आहे. मोदी यांच्या कोर्टात कांजूरचा चेंडू टाकून ठाकरे यांनी फडणवीस यांना शह दिल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता कांजूरच्या मुद्द्यावर फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS