माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार

अहमदनगर/प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुचित उदगार काढणारा नगर मनपाचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाख़ल

श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24
माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ
श्रीपाद छिंदमच्या विरोधात होणार दोषारोपपत्र दाखल l LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी-छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुचित उदगार काढणारा नगर मनपाचा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाख़ल होणार आहे. राज्याच्या गृहविभागाने त्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, या संदर्भामध्ये तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी त्यांनी छिंदमविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे व लवकरच दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपचा तत्कालीन उपमहापौर शिवद्रोही श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर नगरसह राज्यभरातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. तोफखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच भाजपचे तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष व खासदार (स्व.) दिलीप गांधी यांनी त्याची उपमहापौरपदावरून हकालपट्टी केली होती तसेच मनपाच्या महासभेने त्याचे नगरसेवकपद रद्द केले होते. हा निर्णय राज्य सरकारनेही कायम केल्याने नंतरच्या निवडणुकीत तो अपक्ष निवडून आल्यावरही त्याचे नगरसेवकपद रद्द झाले होते. या पार्श्‍वभूमीवर आता त्याच्याविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्याची परवानगी राज्याच्या गृहविभागाने दिली आहे.

फोनवर उच्चारले अपशब्द
फेब्रुवारी 2018मध्ये मनपात तत्कालीन भाजपचा उपमहापौर असलेला श्रीपाद छिंदम याने महापालिकेमध्ये कामे वेळेवर होत नसल्याने महापालिकेतील कर्मचारी बिडवे याला फोन करून दमदाटी करून शिवीगाळ केली व तसेच यावेळी त्याच्याशी बोलताना छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. या घटनेची दखल महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सुरुवातीला घेतली व तात्काळ या संदर्भामध्ये ही बाब त्यांनी त्या वेळेला वरिष्ठांना त्यांनी सांगितली होती. ही घटना घडल्यानंतर छिंदमच्या त्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झालेली होती. त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यासह राज्यामध्ये उमटले होते. तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयावर सुद्धा त्यावेळी दगडफेक करण्यात आली होती. छिंदम याच्या दिल्लीगेटजवळील कार्यालयावरसुद्धा हल्ला करण्यात आला होता. त्याच्या निषेधाचे फलक सर्वत्र लावण्यात आले होते. दिनांक 16 फेब्रुवारी 2018 रोजी ही घटना घडल्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे येऊन छिंदमवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करा, अशी मागणी केली होती. शिवसेनेचे उपनेते (स्व.) अनिल राठोड यांनी पदाधिकार्‍यांसह त्यावेळेस तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत यासंदर्भात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले होते. त्या वेळेला राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन संबंधित आरोपी छिंदम याला अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. शिवसेनेचे त्यावेळचे शहरप्रमुख संभाजी कदम व दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये पहिला तक्रार अर्ज त्याच्याविरोधात दिला होता व त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

शिताफीने त्याला पकडले
घटना घडल्यापासून तो फरार झालेला होता. भाजपचे तत्कालीन खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचा तो कट्टर समर्थक होता. त्यामुळे पोलिसांनी त्यावेळेला गांधी यांच्याकडे सुद्धा त्याची चौकशी केली होती. मात्र, त्या ठिकाणी तो आढळून आला नव्हता. सायंकाळच्या सुमाराला पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी गेले होते. त्याला नगर-सोलापूर महामार्गावर असलेल्या एका गावामधून शिताफीने अटक केली होती. या सर्व प्रकारानंतर नगर जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये व राज्यांमध्ये विविध संघटनांनी निषेध व्यक्त करुन मोर्चाही काढला होता. त्यामुळे त्या वेळेला वातावरण सुद्ध तंग झाले होते. विविध संघटनांनी आंदोलने करून त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारून राष्ट्रीय व्यक्तींचा अवमान करणार्‍या छिंदमला जास्तीत जास्त सजा द्यावी, अशी मागणी सुद्धा त्यावेळी सर्व स्तरातून करण्यात आली होती.

सरकारने दिली परवानगी
छिंदमविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने राज्य शासनाकडे या गुन्ह्यासंदर्भामध्ये पुढील काय कारवाई व कशा पद्धतीने करावी, यासंदर्भात मार्गदर्शन मागवले होते. आरोपी छिंदम हा शासकीय पदावर (उपमहापौर) असल्यामुळे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी सीआरपीसी 196 अन्वये महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची परवानगी आवश्यक असल्यामुळे याबाबत शासनाकडे जिल्हा पोलिस प्रशासनाने पत्रव्यवहार केला होता. राज्याच्या गृह विभागाने त्यानुसार छिंदम याच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याचे आदेश येथील पोलिस प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. गृह विभागाच्या उपसचिवांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे तोफखाना पोलिस सोमवारी(दि. 19 जुलै) छिंदमविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

असा आहे तो गुन्हा
श्रीपाद छिंदम याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात सन 2018 साली भादंवि कलम 295 (अ) 298, 153 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दि.16 फेब्रुवारी 2018 ला मोबाईलवर मित्र संभाजी कदम यांनी व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मेसेस टाकला की, उपमहापौर छिंदम याचेकडून बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेबाबत कर्मचार्‍यांनी युनियनकडे तक्रार केली आहे. तसेच त्याखाली एक ऑडिओ क्लिप होती. ही क्लीप फिर्यादी यांनी ऐकली असता, त्यामध्ये महापालिकेचे कर्मचारी अशोक बिडवे यांना श्रीपाद छिंदम याने ’काल माणसे का नाही पाठवली नाही, असे विचारले असता, बिडवे यांनी छिंदम यास शिवजयंती होऊ द्या, असे म्हटले. त्यावेळी छिंदम याने महापुरुषाचा अवमान होईल असे वाक्य उदगारले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक के.व्ही.सुरसे यांनी केला आहे.

COMMENTS