ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

’मुंबई सकाळ’ चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (वय 82) यांचे आज सकाळी 7.58 मिनिटांनी विलेपार्ले पश्‍चिम येथील कूपर हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

बायकोला अमानुष मारहाण ; नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल I LOKNews24
नवीन मक्याचे वाण देते १००-१०५ दिवसांत बंपर उत्पादन
तक्रारदार महिलेकडून अधिकाऱ्याने करून घेतला बॉडी मसाज

मुंबई / प्रतिनिधीः ’मुंबई सकाळ’ चे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर (वय 82) यांचे आज सकाळी 7.58 मिनिटांनी विलेपार्ले पश्‍चिम येथील कूपर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. कोरोनावर मात करून गेल्याच आठवड्यात ते ’सेव्हन हिल्स हॉस्पिटल’मधून घरी परतले होते. काल रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तीन आठवड्यांपूर्वी त्यांच्या पत्नी क्षमा नार्वेकर यांचे कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई आणि खूप मोठा  आप्तपरिवार आहे. 

’आता पुढे काय?’ हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय ठरले. उर्दू भाषेत त्याचे भाषांतर झाले तसेच साहित्य अकादमीचा पुरस्कारही लाभला होता. हिंदी व इंग्रजी भाषेतही त्याचे भाषांतर झाले आहे. त्यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मुंबईतील अनेक नामवंत पत्रकार आणि संपादक  घडविण्यासाठी नार्वेकर यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळावे, गिरणी कामगारांना न्याय मिळावा, नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. दूरदर्शनचा सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कारासह अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झालेले नार्वेकर संपादक या नात्याने अमेरिका, जपान, रशिया, इस्राएल, बांगला देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड अशा  विविध देशात महत्वाच्या घटनांचे साक्षीदार राहिले आहेत. लोणावळा येथील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या दि. गो. तेंडुलकर स्मृती मंदिर उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. किंबहुना, त्यांच्याच पुढाकाराने निसर्गरम्य परिसरातील पत्रकार संघाची ही वास्तू उभी राहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष आणि विश्‍वस्त म्हणून काम केलेल्या नार्वेकर यांनी पत्रकार हिताच्या अनेक योजना राबवल्या होत्या. मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर   पत्रकारितेचा मार्ग स्वीकारून समाज हितासाठी झटणारे आणि अनेकांना तसे  झटण्याची, लोकाभिमुख पत्रकारितेची प्रेरणा देणारे नार्वेकर म्हणजे पत्रकारितेचे विद्यापीठ होते. कोविड नियमानुसार नार्वेकर यांच्यावर मुलगी जयश्री, शिल्पा आणि जावई बिमल पारिख या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

COMMENTS