महाविकास आघाडीची एकजूट भाजपच्या अपेक्षे पलिकडे!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

महाविकास आघाडीची एकजूट भाजपच्या अपेक्षे पलिकडे!

महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात ईडी ने केलेल्या कारवाईनंतर महा विकास आघाडीन

रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे नेवासाफाटा येथे शनिवारी आगमन
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार
डिक्कीतून नेला बाळाचा मृतदेह

महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात ईडी ने केलेल्या कारवाईनंतर महा विकास आघाडीने निर्णायक लढा देण्याचे ठामपणे ठरवलेले दिसते. केंद्रीय सत्तेच्या आधाराने भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वेळोवेळी वेगळ्या षड्यंत्र पूर्वक कारवाया करून राज्य सरकारला कोंडीत पकडून आणि सत्ता पदच्युत करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. नवाब मलिक यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत सतरा वर्षापूर्वीच्या जमीन व्यवहाराचा भाग दिसत असला तरी प्रत्यक्षात ही कारवाई राजकीय सूड बुद्धीचा भाग आहे, असे आता सर्वसामान्य लोकांनाही समजून चुकले आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत जनतेच्या मैदानात भाजपची झालेली पीछेहाट आणि उत्तर प्रदेश मध्ये योग्य भवितव्य दिसत नसल्याने महाराष्ट्राकडे नजर वळवून राज्यातल्या पंधरा नगरपालिका किंवा महापालिका या आपल्या कवेत खेचण्याचा एक राजकीय डावपेच भाजप करीत असल्याचे बोलले जात आहे. अर्थात ईडीची कारवाई केवळ भाजपातील केंद्रीय सरकारच करते, असे नाही; तर त्याच्या मागे संघाचा देखील तेवढाच हात असावा, अशी जनमानसात धारणा आहे. कारण अधिकारी स्तरावर संघाने अधिक माणसं पेरलेली आहेत. नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई केल्यानंतर भाजपचा जो होरा होता की अनिल देशमुख यांच्या सारखेच नवाब मलिक यांनाही एकाकी सोडून देतील. परंतु नवाब मलिक यांना हात लावणे म्हणजे एक प्रकारे थेट शरद पवार यांना आव्हान देण्यासारखे असल्याने शरद पवार यांनी काल दिवसभर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेऊन शेवटपर्यंत हार न मानण्याचा एक प्रकारे संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि काँग्रेस देखील तेवढीच आक्रमक होऊन केंद्रातील भाजप सरकार आणि केंद्रीय यंत्रणा विरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. त्यामुळे ईडी सारखी केंद्रीय यंत्रणादेखील हादरली असेल. गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राज्य नेतृत्वाने किंवा राज्यातील नेत्यांनी आरोप करायचा, त्यासाठी किरीट सोमय्या यांना पुढे करायचं, चंद्रकांत पाटील यांनी वेगळ्याच पद्धतीने शब्दफेक करायची आणि फडणवीस यांनी त्यावर कळस चढवायचा अशा प्रकारची ही सूत्रबद्ध यंत्रणा त्यांनी राबवणे हाती घेतलेले दिसते. अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर महाविकासआघाडी फारशी प्रतिक्रिया देऊ शकली नव्हती, आणि काहीशी संरक्षित म्हणूनच आपली भूमिका निभावली. परंतु नवाब मलिक यांच्यावरील कारवाई नंतर महाविकास आघाडीच्या घटकांनी ज्या पद्धतीने राजकीय आक्रमकता दाखवली ती केवळ भाजपच्या नेत्यांच्या विरोधातच नव्हे तर ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात देखील. त्यामुळे नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई ही आता कोणत्याही परिणामांना तोंड द्यायचे झाले तरी, त्याची किंमत मोजून आता केंद्रीय यंत्रणा आणि त्या आडून राजकारण करणाऱ्या भाजप यांच्या विरोधात आपली शक्ती एकवटण्याचे राज्यातील महाविकास आघाडीने ठरवलेले दिसते. राजकारणात काहीतरी पथ्य पाळायचे असतात, याचे भान विरोधी पक्ष म्हणून भाजपने गमावले असल्याचे आता पूर्णत:  स्पष्ट झालेले आहे. राजकारणात सत्ता येणे आणि जाणे हे क्रमप्राप्त असते. परंतु, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने राजकीय सत्ता ही केवळ आपल्या हातून निसटता कामा नये, ही एक प्रकारची हुकमी पद्धत आपल्या मानसिकतेत बनवून घेतली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी आपण कायमच सत्तेत असू आणि राहू असा मनोदय ठरवून ते आपल्या समकक्ष किंवा आपल्या वरिष्ठ असणाऱ्या विरोधी पक्ष्यांच्या म्हणजेच महाविकासआघाडीतील नेत्यांचा ते ज्या पद्धतीने सूड घेत आहेत, ते राजकीय संस्कृतीला धरून नाही. परंतु शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आज मंत्रालयाच्या आवारात ज्या पद्धतीने आपली एकजूट दाखवली त्याचे पडसाद देशव्यापी उमटतील आणि त्याचा निश्चितपणे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात परिणाम देखील होईल! कारण आता सर्वसामान्य जनता देखील भाजपचे हुकूमशाही पद्धतीचे वर्तन आणि एकाधिकारशाही पद्धतीने सुरु असणारी राजवट या दोन्ही बाबींना समजून चुकली असून जनता महागाईने होरपळत आहे आणि आपल्या अधिकारांपासून वंचित होत आहे, हे आता जनतेच्या लक्षात येऊ लागल्याने भाजपला आता सर्वच राज्यातून जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे भाजप अधिक चेकाळण्याचा प्रयत्न करीत आहे.

COMMENTS