ममता, भाजप राहुलच्या वाटेवर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ममता, भाजप राहुलच्या वाटेवर

कोरोनामुळं बाधितांचं प्रमाण दररोज पावणेतीन लाखांवर गेलं आहे.

विनयभंग प्रकरणातील आरोपी तीन तासात पकडला
अटकेच्या विरोधात नवाब मलिक हायकोर्टात
उर्फी जावेदला पोलिस संरक्षण द्यावे

कोरोनामुळं बाधितांचं प्रमाण दररोज पावणेतीन लाखांवर गेलं आहे. मृत्यूंचं प्रमाण ही वाढलं आहे. गर्दी हेच कोरोना संसर्गाचं मोठं कारण आहे. त्यामुळं आता उच्च न्यायालयंही सक्रिय झाली आहेत. टाळेबंदी लागू करण्याचे आदेश ते देत आहेत. अशा पार्श्‍वभूमीवर निवडणुकीच्या प्रचारसभा न घेण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे. त्यांच्यावर या निर्णयावरून टीका करणार्‍यांनाही त्यांच्याच मार्गावरून जावं लागतं आहे. 

काहींना गर्दीचं व्यसन असतं. आयुष्यात एवढी गर्दी कधीच पाहिली नाही, असं नेते छातीठोकपणे सांगतात. एवढी गर्दी आपण जमवू शकतो, याचा त्यांना अभिमान असतो. गर्दी नसली, की नेते सैरभैर होतात. त्यात निवडणूक प्रचारसभांना जमणारी गर्दी म्हणजे यशाचं गमक असतं. त्यामुळं नेत्यांच्या दृष्टीनं लाखोंच्या सभा, रॅली काढल्या जातात. शक्तीप्रदर्शन केलं जातं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दोनच दिवसांपूर्वी निवडणूक आणि कोरोना यांचा काहीही संबंध नाही, असं छातीठोकपणे सांगितलं होतं. गर्दीमुळं कोरोनाचा वेगानं संसर्ग पसरतो, म्हणून राहुल गांधी यांनी सर्वांत अगोदर निवडणूक प्रचारसभा रद्द केल्या. निवडणुकीपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे आहेत, असं त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्या पक्षाला पश्‍चिम बंगालमध्ये कमावण्यासारखं काहीच नाही. त्याचं कारण त्यांच्या पक्षाला आहे, त्या जागा टिकविणंही मोठं आव्हान आहे. गमावण्यासारखं काहीच नसलं, तरी धाडसानं निर्णय घेण्याची धमक असायला लागते. परिणामांची पर्वा न करता जे असा निर्णय घेतात, त्यांचं मग कौतुक होतं. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वंच स्तरांतून कौतुक व्हायला लागलं. गेले अनेक दिवस ज्या गोष्टीची भीती होती, तीच खरी ठरताना दिसत आहे. गेल्या 15 दिवसांचा विचार केल्यास विधानसभा निवडणुका असलेल्या चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एक ते 14 एप्रिल या कालावधीत आसाममध्ये 532 टक्के, बंगालमध्ये 420 टक्के, तामिळनाडूत 159 टक्के, पुद्दुचेरीत 165 टक्के, तर केरळमध्ये 103 टक्क्यांनी कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्या 15 दिवसांत निवडणुका असलेल्या चार राज्यांतील तसंच एका केंद्रशासित प्रदेशातील मृत्यूचं प्रमाण 45 टक्क्यांनी वाढलं. निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष या दोघांनाही लोकांच्या जीवितापेक्षा निवडणूक महत्त्वाची मानली. निवडणूक दोन-तीन महिने पुढे गेली असती, तरी काही बिघडण्यासारखं नव्हतं; परंतु निवडणूक घेणं हेच आपलं काम आहे, अशी फुशारकी मारणार्‍या निवडणूक आयोगानं किमान लाखोंच्या प्रचारसभा घेण्यावर बंधनं घालायला हवी होती. आभासी प्रचारसभा आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रॅली काढता आल्या असत्या; परंतु शक्तीप्रदर्शन हेच निवडणुकीतील यशाचं गमक मानणार्‍या राजकीय पक्षांना ते मान्य नव्हतं आणि सत्ताधारी पक्षाच्या पिंजर्‍यातला पोपट झालेला निवडणूक आयोग ते करण्याचं धारिष्टय दाखवू शकला नाही. पश्‍चिम बंगालमधील दोन टप्प्यांचं मतदान अद्याप व्हायचं आहे. त्यामुळं येथील कोरोनाबाधितांचा आकडा काही दिवसांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या राज्यांतून तसंच पुद्दुचेरीतून येत असलेली कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांनी पश्‍चिम  बंगालमधील निवडणूक सभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय रास्त आहे. त्यांच्या या निर्णयांची काहींनी टिंगलटवाली केली असली, तरी त्यांच्याच वाटेवरून आता अन्य राजकीय पक्षांना जावं लागत आहे, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. यापूर्वी राहुल गांधी यांनीही पश्‍चिम बंगालमधील आपल्या सर्व प्रचार रॅली रद्द केल्या आहेत. मोठ्या सभा घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार व्हावा असं आवाहन त्यांनी केलं होतं. ‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मी पश्‍चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा स्थगित करत आहे. मी सर्व नेत्यांना सांगू इच्छितो, की सध्याच्या परिस्थितीत मोठ्या सभा, रॅली आयोजित करण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार करा’, असं ट्वीट राहुल यांनी केलं. त्यांच्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राहिलेल्या टप्प्यातील मतदानासाठी आपण निवडणूक प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट करत त्याबाबत माहिती दिली. ‘बंगाल निवडणुकी दरम्यान कोरोना ज्या वेगानं वाढत आहे, ते पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता कोलकातामध्ये प्रचार करणार नाहीत. त्या निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रतिकात्मक पद्धतीनं एक बैठक घेतील. ज्या ठिकाणी आधीपासून रॅलीचं आयोजन करण्यात आलं, तिथे वेळ कमी करून फक्त 30 मिनिटांत रॅली संपवली जाईल’, अशी माहिती डेरेक यांनी दिली. राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपनंही मोठा निर्णय घेतला आहे. बंगालमध्ये भाजपच्या रॅलीत आता पाचशेपेक्षा अधिल लोक असणार नाहीत. त्याचबरोबर या सभा मोकळ्या मैदानात घेण्यात येईल, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. गर्दीचं समर्थन करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांना गर्दीचं व्यसन आहे. लाखोंच्या सभा घेणं म्हणजे मर्दुमकी अशा थाटात वागणार्‍या भाजपला आता उपरती का झाली, असा प्रश्‍न कुणालाही पडू शकतो. मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभांमध्ये फक्त पाचशे लोकांचीच उपस्थिती असणार आहे. भाजपनं सहा कोटी मुखपट्या आणि सॅनिटायझर वाटपाचं लक्ष्य ठेवल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. आजार होऊ द्यायचा आणि नंतर उपाययोजना करायच्या, असा हा प्रकार आहे. कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपाययोजना गरजेच्या आहेत तसंच भाजपच्या सदस्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत समन्वय राखला जावा, अशा सूचनाही नड्डा यांनी विविध राज्यातील भाजपच्या प्रमुखांना केल्या आहेत. त्याचबरोबर पक्षाकडून स्वच्छता अभियान राबवावं, कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवावी, असं त्यांनी म्हटलं आहे. कोरोनाचे नियम पदोपदी पायदळी तुडविणार्‍यांनी तमाशाच्या स्टेजवर कीर्तन करावं, यासारखा हा प्रकार आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही झपाट्यानं वाढत आहे. गुजरात, उत्तर प्रदेशात तर न्यायालयानंच टाळेबंदी करायला सांगितली. त्याचं कारण गर्दीला आणि पर्यायानं कोरोनाला रोखणं हेच आहे. या पार्श्‍वभूमीवर आता भाजपन एक मोहीम हाती घेतली आहे. नड्डा यांनी पक्ष सदस्यांना ‘अपना बूथ कोरोना मुक्त’ अभियान राबवण्याच्या सूचना केल्या आहेत. हे सर्व चांगलंच आहे; परंतु याला पश्‍चातबुद्धी असं म्हणतात. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमुक्त भारत करण्याचं स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपला त्यांच्याच मार्गावरून जावं लागत आहे. निवडणुकीत काय व्हायचं, ते होईल; परंतु निवडणुकीच्या अंतिम चरणात का होईना नेत्यांना सन्मार्ग सुचला, हे ही नसे थोडकं.

COMMENTS