मनपात जगताप समर्थकांनी  गुंडगिरी व धुडगूस घातला : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपात जगताप समर्थकांनी गुंडगिरी व धुडगूस घातला : काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळेंचा आरोप

मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शुक्रवारी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या तीन पुस्तकांचे दिल्लीच्या कार्यक्रमात विमोचन
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणतीही निवडणूक घेऊ नये : ओबीसी काँग्रेसची मागणी
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असणार्‍या पोलिस दलास कोरोना संरक्षणासाठी मास्क व सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी- मनपा आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी शुक्रवारी धुडगूस घातला. जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती. त्यांनी खुर्च्यांची आदळाआपट केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. या घटनेतून नगर शहरात संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय, अशी तणावपूर्ण परिस्थिती मनपात निर्माण झाली होती, असा दावाही काळे यांनी केला. 

    याबाबत माहिती देताना ते म्हणाले, जुन्या महापालिकेमध्ये ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांच्यासह मनपा आरोग्य अधिकार्‍यांशी लसीकरणाच्या सुरू असणार्‍या गोंधळाबाबत चर्चा करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्या ठिकाणी आधीपासूनच आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनामध्ये जगताप यांनी आपल्या गुंड कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने याठिकाणी एकत्रित केले होते, असे सांगून ते म्हणाले, आम्ही काँग्रेस पदाधिकार्‍यांनी दालनात प्रवेश केल्यानंतर आधीपासून सुरू असणारी चर्चा पाहून वाट पाहणे पसंत केले. मात्र, काही वेळात आमदार जगताप यांच्या चिथावणीवरून त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी काळे यांच्यावर हल्लाबोल सुरू केला. चार-पाच काँग्रेस पदाधिकार्‍यांना जगताप यांचे साठ-सत्तर गुंड कार्यकर्ते यांनी धरा रे, मारा रे अशी अरेरावी सुरू केली. जगताप यांनी त्यात तेल ओतायचे काम कले. त्यामुळे त्यांच्या गुंडांचा उत्साह अधिक वाढला. खुर्च्यांची आदळाआपट सुरू झाली. बाटल्या फोडण्याचा प्रयत्न झाला. बाचाबाची सुरू झाली, असे काळे म्हणाले. ते पुढे म्हणाले, या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एसएमएस करून या ठिकाणी तातडीने पोलिस बळ पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच त्या ठिकाणी पोलिस पोहोचले. पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला. अन्यथा, आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी नगर शहराच्या स्थापना दिनी नगर शहराला पुन्हा एकदा एसपी ऑफीस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती करत शहरात दहशत माजवण्याचा डाव यशस्वी केला असता, असा आरोप काळे यांनी केला.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या

मनपात घडलेला प्रकार आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनात असणार्‍या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वेळीच ते फुटेज ताब्यात घेण्याची गरज आहे. अन्यथा, पुरावा नष्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याआधारे घडल्या प्रकाराबद्दल चौकशी करण्याची मागणी काळे यांनी केली आहे.

लस पळवापळवीची चौकशी व्हावी

कैरो, बगदादशी तुलना होणार्‍या नगर शहराची तुलना आता बिहारशी होते, हे शहराचे दुर्दैव आहे, असे सांगून काळे म्हणाले, त्याला शहराचे लोकप्रतिनिधी यांची संस्कृती आणि गुंड प्रवृत्तीची विचारसरणी कारणीभूत आहे. मात्र, आता गुंडगिरीचा अतिरेक होतो आहे. अशा प्रकारच्या घटना जर लोकप्रतिनिधीच करत असतील तर सामान्य माणसाने जगायचे कसे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  शहरामध्ये लसींची पळवापळवी सुरू आहे. आमदाराच्या पीएनने लस पळवल्याचा व्हिडिओ भाजप नेते सुवेंद्र गांधी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी यांना दिसत नाही का? की दिसून सुद्धा ते त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत? या प्रकरणी ज्या आरोग्य केंद्रावरून आमदार जगताप यांच्या पीएने लसी घेऊन गेला, त्याच्यावर मनपाने स्वतः तातडीने गुन्हा दाखल करण्याची गरज असताना सुद्धा तो अद्यापही केलेला नाही, असे यावेळी काळे म्हणाले.

COMMENTS